गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचे काढले वाभाडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नियमितपणे निधी दिला आहे. त्यानुसार कामे वेगाने होणे अपेक्षित आहेच; परंतु प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे आजच्या बैठकीतून दिसून आले. स्मार्ट सिटीच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे, यासाठी आता प्रयत्न करण्यात येतील. 
- गिरीश बापट, खासदार

पुणे - सुमारे तीनशे कोटी रुपयांची कामे झाली म्हणता अन्‌ सल्लागारांना ४६ कोटी रुपये देता, हा कोणता हिशेब आहे? ही कामाची पद्धत आहे का? अशा शब्दांत प्रश्‍न उपस्थित करीत खासदार गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचे मंगळवारी एका बैठकीत वाभाडे काढले. तसेच, प्रशासनाला आठ दिवसांत फेरअहवाल सादर करण्याचेही त्यांनी आदेश दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, महापालिकेतील सभागृहनेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल आगरवाल यांनी स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण सुरवातीला केले.

कोरोना व्हायरसचे दोन संशयित पुण्यात; नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल

त्यानंतर सर्वच लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्‍न उपस्थित केले होते; परंतु त्यांची समाधानकारक उत्तरे आगरवाल यांना देता आली नाहीत. प्लेसमेकिंगची कामे कशा पद्धतीने झाली, रस्त्यांच्या सुशोभीकरणाशिवाय कोणती कामे झाली, पायाभूत सुविधांबाबत स्मार्ट सिटीने काय केले, शहरातील नागरिकांसाठी कोणते प्रकल्प राबविले, मोफत वाय-फाय बंद का पडले, आदींबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. 

पुणे : बायको घ्यायची संशय; नवऱ्याने मागितला घटस्फोट अन्...

सल्लागारांवर खैरात का करण्यात आली, असा प्रश्‍न बापट यांनी उपस्थित केला. ३०० कोटी रुपयांच्या कामांसाठी ४६ कोटींचा सल्ला कसा काय?, असा प्रश्‍न उपस्थित करून, त्यांनी याबाबतचा अहवाल ८ दिवसांत सादर करण्याचा आदेश आगरवाल यांना दिला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ई-बस, ई-रिक्षा यांची खरेदी झाली; परंतु, त्यांचा वापर होताना दिसत नाही, अशीही तक्रार काही लोकप्रतिनिधींनी केली. तसेच स्मार्ट सिटीच्या ५१ प्रकल्पांपैकी ७-८ प्रकल्पही पूर्ण झालेले नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. त्याचीही दखल घेण्याचे आश्‍वासन आगरवाल यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City Work Issue