स्मार्ट सिटीचा ‘शून्य कचरा’ प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

कचऱ्यावर शंभर टक्के सेंद्रिय प्रक्रिया करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘झिरो वेस्ट’ अर्थात शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे वर्गीकरण करणे आणि कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ९० हजार कुटुंबांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे -  कचऱ्यावर शंभर टक्के सेंद्रिय प्रक्रिया करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘झिरो वेस्ट’ अर्थात शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे वर्गीकरण करणे आणि कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ९० हजार कुटुंबांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बोपोडी, सुतारवाडी परिसरात झोपडपट्टी, वस्ती, निवासी, व्यावसायिक, निमशासकीय, शासकीय आदी ठिकाणी सुमारे ९० हजार कुटुंब राहतात. औंधच्या प्रभागामध्ये दररोज सुमारे ११० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी ६२ टन कचरा हा जैविक आहे. या प्रभागातील सुमारे ७० ते ९० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. या ओल्या कचऱ्याची वाहतूक करण्याचा वार्षिक खर्च सुमारे ९ कोटी ७० लाख रुपये एवढा आहे. यासंदर्भात जागृती व प्रशिक्षण देण्यासाठी ‘यशदा’मध्ये नुकतीच कार्यशाळा झाली. 

सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘पुणे स्मार्ट सिटीच्या भागातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची वाहतूक कमी करणे, हा ‘झिरो वेस्ट’ उपक्रमामागील दृष्टिकोन आहे. विकेंद्रित कंपोस्टिंग किंवा सेंद्रिय कचरा प्रक्रिया करणाऱ्या युनिटच्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी, हा उद्देश आहे. त्यातून ‘झिरो वेस्ट’चे मॉडेल शक्‍य आहे.’’

असा असेल प्रकल्प ....
  ओल्या कचऱ्यावर स्रोताच्या ठिकाणीच प्रक्रिया 
  प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३० स्वच्छता मित्रांची नेमणूक 
  कचऱ्यावर सेंद्रिय प्रक्रियेसाठी ‘स्वच्छता मित्र’ प्रोत्साहन देणार  
  घरोघरी जाऊन जागरूकता करणार 
  प्रक्रियेच्या खर्चातील बचतीतून कचरा व्यवस्थापन सुविधा तयार करणार
  प्रकल्पामुळे ‘लॅंडफिल साइट’चे आयुष्य वाढणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City zero waste project