‘स्मार्ट पोलिसिंग’च्या दिशेने...

‘स्मार्ट पोलिसिंग’च्या दिशेने...

पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी स्मार्ट पोलिसिंगच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. वाहतूक सुधारणा करताना तडजोड शुल्कवसुलीसाठी ‘ई-चलन’चा वापर करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, तसेच रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी गस्तीवरील पोलिस बिट मार्शलचे लोकेशन घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत हे बदल दिसून येतील. 

पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी काही महिन्यांपूर्वी स्मार्ट पोलिसिंगची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी मॉडर्न, स्मार्ट, ॲक्‍सेसेबल आणि रिस्पॉन्सिव या चतुःसूत्रीचा अवलंब करीत त्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे आता पोलिस दलाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. महिलांची सुरक्षा, स्ट्रीट क्राइम, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुधारणा, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृतीवर भर देत आहोत, असे पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड, सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी पोलिस बिट मार्शल घटनेच्या वेळी नेमके कोठे आहेत, तसेच एखादी दुर्घटना घडल्यानंतर बिट मार्शलला तातडीने घटनास्थळी पोचता यावे, यासाठी त्यांचे लोकेशन घेण्यात येणार आहे. त्यासाठी विशिष्ट आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

शहर पोलिसांसमोर वाहतूक सुधारणेचे मोठे आव्हान आहे. वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांकडून उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड आकारताना रोख रक्‍कम घेत आहेत. परंतु येत्या काही दिवसांत रोख रकमेऐवजी पोलिस ई-चलन घेताना दिसून येतील. त्या दिशेने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस नियंत्रण कक्षात कॉल केल्यानंतर अनेकदा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नियंत्रण कक्षातही तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत.

तक्रारीसाठी संपर्क क्रमांक 
१००
२६१२२८८०
२६१२६२९६

पोलिस आयुक्‍तांचे ‘हितगूज’
पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्यक्‍तिगत अडचणी जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी थेट संवाद साधण्यास सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी ‘हितगूज’ उपक्रम सुरू केला आहे. त्या स्वतः, सहपोलिस आयुक्‍त सुनील रामानंद, मुख्यालय आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी हे कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. शिवाय, पोलिसांच्या आरोग्य आणि औषधोपचारासाठी काही सुधारणा करण्यात येणार आहेत, ही पोलिस कर्मचाऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे.

दररोज दोन हजार एसएमएस
पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी नागरिकांसाठी ७७१९८८१००७ हा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर नागरिकांकडून दररोज सुमारे दीड ते दोन हजार एसएमएस आणि ८० ते ९० कॉल येतात. परंतु सर्वांशी बोलणे शक्‍य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी एसएमएस करावेत, असे आवाहन रश्‍मी शुक्‍ला यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com