जगण्याची इच्छा सोडलेल्या वृद्धाच्या चेहऱ्यावर "स्माइल' (व्हिडीओ)

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 8 जून 2018

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अश्‍व शर्यतींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला लंडनला पाठविल्याची आठवण ताडेलकर आवर्जून सांगतात. तेथून परतल्यानंतर ताडेलकर यांनी मुंबई, पुण्यासह देशभर अश्‍व शर्यतींसाठी "रेसिंग कन्सल्टंट' म्हणून काम पाहिले. 

पुणे - उमेदीच्या काळात अश्‍व शर्यतींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या हाती भरपूर पैसा खेळत राहिला. मात्र वृद्धापकाळात हाती हा पैसा राहिला नाही. पोटच्या मुलांनीच छळ मांडला. त्या छळास कंटाळून त्यांनी नातेवाइकांच्या घरी आसरा घेतला. पण तिथेही नशिबाने पाठ फिरविली. नातेवाइकांनी एसटी बसमध्ये बसविले ते माघारी न येण्यासाठी! या अपमानास्पद जगण्यापासून मुक्तता मिळावी म्हणून त्या वृद्ध नागरिकाने "आता मरायचंच' असे मनाशी ठरवून पुढच्या प्रवासाला सुरवात केली. त्यांची ती दयनीय अवस्था तरुण सहप्रवाशांनी पाहिली आणि त्यांना धीर देत "स्माइल प्लस सोशल फाउंडेशन'द्वारे मदतीचा हात दिला! 

वसईहून स्वारगेटला येणाऱ्या एस.टी. बसमध्ये ठाण्याच्या वंदना बसस्थानकावर एका 70-75 वर्षांच्या वृद्धास एक व्यक्ती बसवून देत घाई-घाईत निघाली. वाहकासह प्रवाशांनी वृद्ध नागरिकास कोठे सोडायचे आहे, त्यांना घ्यायला कोण येणार आहे असे विचारले, तेव्हा "बस जिकडे जाईल, तिकडे जाऊन मरू द्या' असे उत्तर त्यांना देत त्या व्यक्‍तीने वृद्धाचा पाणउतारा केला. त्या शब्दांनी प्रवाशांचे काळीज अक्षरशः पिळवटून टाकले. वृद्ध प्रवासी बसमध्ये बसले, त्यांनी स्वारगेटचे तिकीट काढले. त्या वेळी त्यांच्या पाठीमागे बसलेल्या स्वाती पिसाळ-भारती या तरुणीने त्यांची विचारपूस केली, तेव्हा हृदय हेलावणारे वास्तव त्यांनी मांडले. प्रवासादरम्यान बसचे वाहक अनिस शेख, स्वाती व विद्यार्थी सागर पाटकरी यांनी त्यांची काळजी घेतली. 

श्रीराम ताडेलकर असे नाव सांगून वृद्धाने आपली कर्मकहाणी सांगण्यास सुरवात केली. मूळचे पुण्याचे असलेले ताडेलकर अश्‍व शर्यतींसाठी सल्लागार म्हणून मुंबईत काम करत होते. साहजिकच हातामध्ये भरपूर पैसा खेळत राहिला. त्यांच्याकडील पैसे चोरून दारू पिण्याचा प्रकार मुलाने सुरू केला. पुढे मुलीनेही त्यांना पैशांसाठी त्रास दिला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर मात्र ताडेलकर यांचे आणखी हाल होऊ लागले. मुला-मुलीच्या त्रासास कंटाळून अखेर त्यांनी घर सोडले. स्वाती यांनी ताडेलकर यांची ही व्यथा "स्माइल प्लस फाउंडेशन'कडे मांडली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश मालखरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत स्वारगेट एसटी स्थानकात जाऊन ताडेलकर यांची भेट घेतली आणि त्यांची व्यवस्था एका वृद्धाश्रमात केली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अश्‍व शर्यतींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला लंडनला पाठविल्याची आठवण ताडेलकर आवर्जून सांगतात. तेथून परतल्यानंतर ताडेलकर यांनी मुंबई, पुण्यासह देशभर अश्‍व शर्यतींसाठी "रेसिंग कन्सल्टंट' म्हणून काम पाहिले. 

मुलगा-मुलगी सांभाळत नाही. पत्नीही देवाघरी गेली. मी आजही कष्ट करून जगू शकतो; पण मला आता खरोखरच जगायची इच्छा राहिली नाही. आज मी जीव देण्यासाठीच बाहेर पडलोय. 
- श्रीराम ताडेलकर 

मुलांकडून आई-वडिलांनाच सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार सध्या अनुभवास येत आहे. त्यामुळे अनाथ व बेघर होऊन हजारो वृद्ध नागरिक सर्वत्र आढळून येतात. सरकारने अशा वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था केली पाहिजे. 
- योगेश मालखरे, संस्थापक, स्माइल प्लस फाउंडेशन 

Web Title: Smile on the old man

टॅग्स