धूरमुक्त वारीसाठी प्रयत्न - पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

देवस्थानची चारशे पासष्ट एकर जागा विकसित करण्यासाठी देवस्थानने विकास आराखडा तयार करून सरकारकडे दिला तर निधीची तरतूद करू.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी भरीव काम करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी चंद्रकांत पाटील आळंदीत आले होते. या वेळी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ॲड. विकास ढगे, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, पंढरपूर देवस्थानचे विश्‍वस्त माधवी निगडे, मुख्यमंत्री कार्यालयातील कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारती, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार यांची उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘दुष्काळामुळे दुष्काळग्रस्त मुलांच्या शिक्षणावर कुऱ्हाड पडू नये यासाठी सरकार मदत करत आहे. देवस्थानसारख्या विश्वस्त संस्थांनीही पुढाकार घेत सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून मदतीचा हात आर्थिक स्वरूपात केला पाहिजे. यापुढे सरकार वारकऱ्यांच्या मुलांना वह्या पेन देणार आहे.’’ या वेळी डॉ. अभय टिळक यांनी पालखी मार्ग चारपदरी करण्याची मागणी केली. आळंदी देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहायतानिधी म्हणून पाच लाखांचा धनादेश चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, विकास ढगे आणि अजित कुलकर्णी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smoke Free Wari Chandrakant Patil