सहाव्या दिवशीही 24 तास धूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पिंपरी - एक अग्निशामक बंब, दोन टॅंकर, दोन जेटिंग मशिन याद्वारे सहा दिवसांपासून २४ तास पाण्याचा मारा सुरू आहे. दोन जेसीबी यंत्रांद्वारे कचऱ्यावर माती टाकली जात आहे. तरीही खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा वल्लभनगर येथील कचरा डेपो धुमसतच आहे. या धुरामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. 

पिंपरी - एक अग्निशामक बंब, दोन टॅंकर, दोन जेटिंग मशिन याद्वारे सहा दिवसांपासून २४ तास पाण्याचा मारा सुरू आहे. दोन जेसीबी यंत्रांद्वारे कचऱ्यावर माती टाकली जात आहे. तरीही खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा वल्लभनगर येथील कचरा डेपो धुमसतच आहे. या धुरामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. 

खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा वल्लभनगर येथील कचरा डेपो २२ एकर जागेवर पसरला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा डेपो असून, त्याला लागणारी सततची आग व दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याबाबत त्यांनी कॅंटोन्मेंट बोर्ड, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाने सुका कचरा टाकणे बंद केलेले आहे. मात्र, जुना कचरा तसाच असून, त्यालाच गेल्या गुरुवारी (ता. २९ मार्च) सायंकाळी आग लागली होती. ती शमविण्याचे काम गेल्या सहा दिवसांपासून रात्रंदिवस सुरू आहे. वर आग शमलेली दिसत असली तरी, आतून धुमसत असल्याने धुराचे लोट निघत आहेत. ही परिस्थिती मंगळवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत कायम होती. हवेच्या झोतानुसार धूर पसरत असल्याने कचरा डेपोच्या चारही बाजूच्या नागरी वस्तीला त्याचा त्रास होत आहे. प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्‍त केली. 

धुरामुळे बाधित क्षेत्र
नाशिक फाटा, कासारवाडी परिसर, दाई-ईची कंपनी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), भोसरी पोलिस ठाणे व वसाहत, सुखवानी कॅम्पस सोसायटी, वल्लभनगर एसटी बसस्थानक, संत तुकारामनगर, वायसीएम रुग्णालय परिसर, महात्मा फुलेनगर या भागासह पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्गाने जाणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना कचरा डेपोतील धुराचा सर्वाधिक त्रास होत आहे.  

कचरा डेपोला नेहमीच आग लागते. त्याबाबत अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत; परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही. 
- कारभारी गाडेकर, वल्लभनगर

पाच-सहा दिवसांपासून आमचे जीवनच विस्कळित झालेले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीबरोबरच धुराचा त्रासही सहन करावा लागत आहे. मोकळ्या हवेत फिरू शकत नाही, अशी स्थिती आहे. 
- एस. जी. वाळुंज, वल्लभनगर

कचरा डेपोबाबत तक्रार केल्यानंतर बोर्डाने सुका कचरा टाकणे बंद केले आहे. जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिलेले आहेत.
- योगेश बहल, नगरसेवक

Web Title: smoke on the sixth day pimpri news fire