सर्पदंशामुळे बारा तास बेशुद्ध पडलेली तनुजा आली शुद्धीवर

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 3 एप्रिल 2019

तनुजा विठ्ठल अरगडे या विद्यार्थिनीला सर्पदंश झाला होता. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. तब्बल बारा तासानंतर तनुजा शुद्धीवर आली. 

मंचर : खडकी -पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथील तनुजा विठ्ठल अरगडे (वय १२) या विद्यार्थिनीला सर्पदंश झाला होता. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. तब्बल बारा तासानंतर तनुजा शुद्धीवर आली. तिच्यावर नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होममध्ये उपचार सुरु आहे. 

काळभैरवनाथ लक्ष्मीबाई बाबुराव बांगर या विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये तनुजा शिकत आहे. मंगळवारी (ता. २) संध्याकाळी राहत्या घरात अभ्यास करत असताना तिला कोब्रा जातीच्या नागाने दंश केला. तिला ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिची प्रकृती खालावली होती. रक्तदाब कमी झाला होता. प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी तिला नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होममध्ये मंगळवारी रात्री सात वाजता उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राउत व डॉ. पल्लवी राउत यांनी तपासणी केली असता तनुजाच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम झाला होता. श्वास बंद पडत चालला होता. नाडीचे ठोके वाढले होते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. ती कोमात गेली होती. तिला कृत्रिम श्वास देण्यात आला.

सर्पदंशावरील लस व इतर तातडीची औषधे देण्यात आली. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर रात्री दहा वाजता तिच्या शरीराची हालचाल सुरु झाली. हे पाहून नातेवाईकानीं व डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. बुधवारी सकाळी सात वाजता ती शुद्धीवर आली. तिने आईला हाक मारली. वडील व डॉक्टरांशी संवाद साधला. "तनुजाच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. वेळेत दवाखान्यात आणल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत'', असे डॉ. राऊत यांनी सांगितले. 

निरगुडेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील, बांगर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील व अरगडे कुटुंबाने डॉ. राउत दांपत्याचे अभिनंदन केले.  

Web Title: Snake Bite to Girl after 12 Hours Girl gets Conscious

टॅग्स