अबबब.. चिमुकल्याच्या बुटात शिरला साप 

दत्ता पोपळघट 
मंगळवार, 23 जुलै 2019

शिक्षकाच्या प्रसंगावधानाने विद्यार्थ्याला नागाचा दंश टळला; वडकी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार 

पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकी येथे शिक्षकाच्या धाडसामुळे एका पाच वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याला नागाचा दंश होता होता वाचला. शिक्षकाने मोठ्या धाडसाने नागाला पकडल्याने विद्यार्थ्याच्या जीविताचा धोका टळला. 

पुणे  : वडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  शिक्षकाच्या धाडसामुळे एका पाच वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याला नागाचा दंश होता होता वाचला. शिक्षकाने मोठ्या धाडसाने नागाला पकडल्याने विद्यार्थ्याच्या जीविताचा धोका टळला. 
वडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच छोट्या विद्यार्थ्यांची अंगणवाडीही भरते. नुकताच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात विठ्ठल झालेल्या दिव्यराज नवनाथ झांबरे (वय 5) या विद्यार्थ्याने पायातील बूट शाळेच्या व्हरांड्यात काढून ठेवून तो पालखीसोबत परिसरात गेला. अंगणवाडीशेजारच्याच वर्गाचे शिक्षक शिवाजी विश्वनाथ जाधव वर्गाबाहेर आले असता, त्यांना विद्यार्थ्यांच्या बुटात फणा काढलेला नाग बसल्याचे दिसले. शाळेत नाग आला व तोही बुटात शिरल्याचे ऐकून शिक्षक, विद्यार्थी यांची वर्गासमोर गर्दी झाली. घाबरलेल्या व आरडाओरडा करणाऱ्या मुलांना शांत करीत शिवाजी जाधव यांनी नागाला न मारता मोठ्या धाडसाने व शिताफीने प्लॅस्टिकच्या बाटलीत नागाला जेरबंद केले. विशेष म्हणजे जाधव यांनी यापूर्वी कधीही साप पकडला नव्हता. नंतर नागाला दिवेघाट परिसरात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दिव्यराजची आई सारिका यांना हा प्रकार समजताच त्या धावत शाळेत आल्या. 
मुलाच्या बुटात शिरलेला नाग पकडला असून, आपला मुलगा सुरक्षित असल्याचे पाहताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अाणि शिक्षक जाधव यांचे अाभार मानले.

''पावसाळ्यात अनेकदा जमिनीवर साठलेले पाणी साप, विंचू व अन्य सरपटणाऱ्या प्राण्याच्या बिळात शिरल्याने ते बिळाबाहेर येतात. सुरक्षित आसरा शोधताना ते अनेकदा घराबाहेरच्या बूट, डबे, अडगळीच्या जागा येथे येऊन बसतात. यासाठी पावसाळ्यात सर्वांनी साप, विंचू याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सापाला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला पकडून नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासातच सोडावे.''
- संदीप घुले, सर्पमित्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snake in the shoe's