सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - सामाजिक चळवळीतून न्याय आणि समानतेसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, "लोकायत'च्या संस्थापक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मे (वय 84) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवारी पुण्यात निधन झाले. 

पुणे - सामाजिक चळवळीतून न्याय आणि समानतेसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, "लोकायत'च्या संस्थापक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मे (वय 84) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवारी पुण्यात निधन झाले. 

लोकांचे प्रश्‍न सातत्याने मांडणाऱ्या सुलभाताईंनी "नोटाबंदीमुळे जनतेवर होणारे परिणाम' या विषयावर आठवडाभरापूर्वीच सविस्तर लेख लिहिला होता. शिवाय पुरंदरला भेट देऊन विमानतळविरोधी शेतकरी आणि स्थानिकांच्या संघर्षालाही पाठिंबा दिला होता. अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या; पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे त्यांचे बंधू व पर्यावरणाचे अभ्यासक माधव गाडगीळ आणि पुरुषोत्तम गाडगीळ असा परिवार आहे. 

सुलभाताईंची सामाजिक क्षेत्रातील कामाची सुरवात झाली ती संशोधनातून. त्यातून साधलेला लोकसंवाद आणि विविध आंदोलनातील सहभागातून. अर्थशास्त्र विषयातील एमए, पीएच.डी. केल्यानंतर 1959 पासून गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये 1992 पर्यंत त्यांनी संशोधकपदी काम केले. सुलभाताईंचे वडील बॅ. धनंजयराव गाडगीळ यांनीच ही संस्था 1930 मध्ये स्थापन केली होती. त्यांचा उद्देश सुलभाताईंनी आपल्या कामातून दाखवून दिला. गोखले अर्थशास्त्र संस्था आणि समविचारी सहकारी यांनी एकत्र येऊन "समाजविज्ञान ग्रंथालया'चीही स्थापना केली. त्यासाठीही सुलभाताईंनी पुढाकार घेतला होता. 

"पानशेत धरण फुटल्यानंतर' या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. अभ्यासगट स्थापन केला. 1972 च्या दुष्काळात निर्माण झालेल्या समस्यांचा वेधही त्यांनी पुस्तकातून घेतला. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी लोकायत व्यासपीठ स्थापन केले. या माध्यमातून लोकायत शिक्षण प्रकल्प, वैद्यकीय केंद्र, फिल्म क्‍लब, सांस्कृतिक मंच असे विविध उपक्रम राबवून त्यांनी अधिकाधिक लोकांना जोडून घेतले आणि नवी दिशाही दाखवली. पुरोगामी महिला संघटना, बायजा ट्रस्ट, स्त्रीमुक्ती चळवळीचा त्या आधार होत्या. अण्वस्त्रविरोधी आणि शांतता चळवळ, एन्‍रॉन, जैतापूरसारख्या आंदोलनात विश्‍लेषक आणि कार्यकर्त्याची त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शेतीच्या अर्थकारणावर त्यांचा अभ्यास होता. त्यांनी विज्ञान, समाज-अर्थशास्त्रावरील प्रबोधनात्मक लेखन केले. "प्लॅनिंग फॉर द मिलियन्स', "प्रोड्युसर्स को-ऑपरेटिव्हज एक्‍सपिरियन्स अँड लेसन्स फ्रॉम इंडिया', "विमेन वर्कर्स इन इंडिया ः स्टडीज इन एम्प्लॉयमेंट अँड स्टेट्‌स', "ड्रॉट्‌स इन महाराष्ट्र', "1972 ः द केस ऑफ इरिगेशन प्लॅनिंग' अशी विविध पुस्तके लिहिली. 

श्रद्धांजली सभा रविवारी 

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध डाव्या-पुरोगामी संघटनांतर्फे सभा आयोजिण्यात आली आहे. ती सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात रविवारी (ता. 4) सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

Web Title: Social activist Dr. Sulabha Brahma dies