सोशल मीडिया ठरतोय तरुणींसाठी धोक्‍याची घंटा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबतचे तक्रार अर्ज आल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन तातडीने कारवाई केली जाते. यासाठी महिलांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 
- विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

पिंपरी - तरुणींना प्रेमात ओढायचे, तिच्याशी जवळीक साधत मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ काढायचे... दरम्यान दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाल्यास तरुणाकडून तरुणीचे अश्‍लील फोटो अथवा बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकायचे... शहरात गेल्या सहा महिन्यांत अशा ६२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामुळे तरुणींनी अशा घटनांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचणे सोपे झाले आहे. मात्र, अनेक जण या सोशल मीडियाचा गैरवापरही करीत आहेत. तरुण-तरुणी प्रेमात पडतात. फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी फोटो अथवा व्हिडिओ काढतात. मात्र, नंतर काही तरुण फोटो व व्हिडिओचा गैरवापर करतात. दोघांमध्ये काही वादविवाद झाला अथवा तरुणीने लग्नास नकार दिल्यास जुने फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तरुणाकडून दिली जाते. अनेक प्रकरणांत तर अश्‍लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याने तरुणींचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले आहे. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एक जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल ६२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये फिर्यादी या महिला आहेत. यामध्ये अश्‍लील फोटो, व्हिडिओ तसेच बदनामीकारक मजकूर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप यासारख्या सोशल मीडियाद्वारे व्हायरल केल्याबाबतच्या तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. सायबर सेलने यातील २५ तक्रारी निकाली काढल्या असून, ३७ अर्जांचा तपास सुरू आहे. आयटी ॲक्‍टअंतर्गत संबंधितांवर कारवाई केली जाते.

एकाला अटक
फेसबुकवर बदमानीकारक पोस्ट तसेच व्हॉट्‌सॲपवर अश्‍लील फोटो टाकून महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Media Girls Complaint Danger Crime