सोशल मीडियावर रोमिओंचा "बाजार' 

सलील उरुणकर 
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - "तू खूप सुंदर दिसतेस, मला तुझा आवाज ऐकायचा आहे, तू मला कधी भेटशील, प्लीज एकदा बोल माझ्याशी,'... रात्री दीड वाजता माझ्या मोबाईलवर फेसबुक मेसेंजरद्वारे हे संदेश येत होते. सुरवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र हा प्रकार सुरूच राहिला. अखेर संग्रामराजे भोसले पाटील नावाच्या "त्या' मुलाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. या सर्व चॅटिंगचे "स्क्रीनशॉट' घेऊन माझ्या फेसबुकच्या टाइमलाइनवर टाकले. कोणा अपरिचित व्यक्तीला घाबरण्यापेक्षा त्याने केलेल्या गैरकृत्याचे पुरावे सोशल मीडियावर टाकून त्याचे वाभाडे काढणेच मला योग्य वाटले. 

चिन्मयी सुर्वे या मुलीची ही प्रतिक्रिया. नुकतेच एका मुलाच्या गैरवर्तनाला कंटाळून संपूर्ण घटनेची माहिती आणि संबंधित मुलाचे नाव व मोबाईल क्रमांक चिन्मयीने फेसबुक अकाउंटद्वारे जगजाहीर केला. यापूर्वीही एका दिल्लीतील मुलीने तिला त्रास देणाऱ्या मुलाच्या नावाने आलेले धमकीचे ई-मेल सोशल मीडियाद्वारे लोकांसमोर आणले होते. यावरून लैंगिक छळाच्या आणि छेडछाडीच्या विरोधात सोशल मीडियाद्वारे आवाज उठविणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. 

चिन्मयीच्या बाबतीत घडलेला प्रकार अद्यापही थांबलेला नाही. सोशल मीडियावर थेट पोस्ट केल्यामुळे "चिडलेल्या' त्या मुलाने तिला धमकावण्यास सुरवात केली आहे. "तुला काय वाटतं, तू खूप शहाणी आहेस का ? स्वतःला भारी समजते का ? मी तुला तुझी जागा दाखवून देतो !' असे संदेश आता तो मुलगा चिन्मयीला पाठवत आहे. मात्र चिन्मयी त्या मुलाच्या विरोधात सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

""फेसबुकवर घटनेची माहिती टाकल्यावर मला माझ्या मित्र-मैत्रिणी व परिचितांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद आणि आधार मिळाला. अनेक मुलांनी संपर्क साधून या लढाईत आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि कधीही मदत करण्याची ग्वाही दिली, त्यामुळे अशाप्रकारचा छळ सोसण्यापेक्षा थेट वाभाडे काढण्याचा पर्याय मुलींनी स्वीकारावा असे मला वाटते,'' असेही चिन्मयीने सांगितले. 

Web Title: on social media Romeo market