सोशल मीडियाद्वारे तरुणांना आकर्षित करणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, प्रभागांमध्ये कोपरा सभा, नेत्यांच्या सभा, पदयात्रा ही पारंपरिक प्रचार यंत्रणा राबविताना, "सोशल मीडिया'च्या माध्यमातून तरुण मतदारांना आकर्षित करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आखली आहे.

पुणे - घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, प्रभागांमध्ये कोपरा सभा, नेत्यांच्या सभा, पदयात्रा ही पारंपरिक प्रचार यंत्रणा राबविताना, "सोशल मीडिया'च्या माध्यमातून तरुण मतदारांना आकर्षित करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आखली आहे.

प्रामुख्याने पक्षाची ध्येयधोरणे मांडत या निवडणुकीच्या निमित्ताने नवा मतदार पक्षाच्या पाठीशी उभारण्याचा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. 
नव्या रचनेतील 41 प्रभागांमध्ये कोपरा सभा घेण्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भर असून, किमान दोन प्रभागांकरिता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांची सभा घेण्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार तारिक अन्वर, खासदार मस्जिद मेमन यांच्या राज्यातील माजी मंत्र्यांचा फौजफाटा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविण्यात येणार आहे. या पारंपरिक प्रचार यंत्रणेबरोबरच "सोशल मीडिया'च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. चौकात "एलईडी स्क्रीन' उभारून त्यातून केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश मांडण्याच्या उद्देशाने यंत्रणा उभारली आहे. त्यात, गेल्या दहा वर्षांत शहरात केलेली कामे, पुढील पाच वर्षांतील महत्त्वाचे प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी, विकासाची दृष्टी आणि पक्षाची ध्येयधोरणे मांडणाऱ्या चित्रफिती तयार केल्या आहेत. "हायटेक' प्रचार यंत्रणेसाठी जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल "सेंट्रल पार्क'मध्ये "वॉर रूम' उभारण्यात आली आहे. 
दरम्यान, पक्षाचे नेते अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी सारसबाग परिसरात प्रचाराचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

हजारी प्रमुखांची मदत घेणार 
नव्याने नेमलेल्या हजारी प्रमुखांच्या माध्यमातून त्या-त्या प्रभागांमधील मतदारांची मोट बांधली जाणार असून, त्याकरिता पक्षाच्या विधानसभा मतदारसंघातील पक्ष निरीक्षकांची मदत घेण्यात येत आहे. या दोन्ही व्यवस्थांना एकत्र आणून प्रत्यक्ष काम सुरू केले असून, त्यांच्या कामाबाबत नियमित बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहे.

Web Title: Social media will attract youth