क्या बात...! जेष्ठ नागरिकांचा सोशल विरुंगळा

whatsapp-grop.jpg
whatsapp-grop.jpg

पुणे : (धनकवडी) : आपण आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे आपले आरोग्य चांगलं आहे की नाही कळलं... वसंत तू आज योगाला का नाही आलास... तिरुपती आणि राळेगणसिद्धीची ट्रीप मस्त झाली.... पुन्हा जाऊयात... हा संवाद आहे सातारा रस्ता परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरचा...या ज्येष्ठांनी सोशल मीडियावर जणू विरंगुळा केंद्रच तयार केले आहे.
 
धनकवडी, बिबवेवाडी, सहकारनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसर भागात सध्या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून........ ज्येष्ठ नागरिक संघ सक्रिय झाले आहे. नोकरी अन्‌ कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मुलांना त्यांच्यासाठी वेळ नाही; पण काय झाले ज्येष्ठांनी यावर चांगला पर्याय शोधला अन्‌ व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे आपला वेगळा विरंगुळा शोधला आहे. भेटीगाठीच्या संवादासह आरोग्याशी निगडित गप्पा असो वा एखाद्या सहलीतील भन्नाट अनुभव... या ग्रुपच्या माध्यमातून शेअर केले जात असून, अनेक ज्येष्ठांसाठी हे ग्रुप एक आधारवड बनले आहेत.

वैयक्तिक आयुष्यातील समस्या असो वा एखादी शासकीय योजना... अशा कित्येक विषयांवर अगदी सहजपणे ते संवाद साधू लागले आहेत. व्हॉट्‌सऍपसह फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्‌विटरही त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. सोशल मीडियावर तरुणाईची मक्तेदारी आहे, हा समज ज्येष्ठ नागरिकांनी खोडून काढला आहे. ज्येष्ठही आता सोशल मीडियाचा वापर सहजतेने करत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघांनी तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारेही त्यांना "शेअरिंग'चे माध्यम मिळाले आहे. त्याचा सर्वाधिक वापरही होत आहे. 

ज्येष्ठ नागरिक संघांकडून ज्येष्ठांशी संबंधित असलेली माहिती पोचविण्यासाठी खास विभागानुसार व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले आहेत. याबाबत भारती विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील म्हणाले, "विभागानुसार तीन व्हॉट्‌सऍप ग्रुप आहेत. तसेच योगाचा वेगळा ग्रुप आहे. यामध्ये शासकीय-निमशासकीय, शिक्षक, पोलिस अधिकारी असे विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नागरिक मिळून 500 हून अधिक सदस्य जोडले गेलो आहोत.''

तानाजी शिंदे म्हणाले, "या ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य, शासकीय योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, कौटुंबिक वाद-समस्या आणि मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद, तसेच आरोग्य शिबिरे, व्याख्याने आयोजित करतो. संवाद साधण्यासाठी हे प्रभावी माध्यम मिळाले असून, प्रत्येक जण यावर सक्रिय आहे.''

ज्येष्ठ महिलांकडूनही व्हॉट्‌सऍपचा उपयोग करत आहेत. भिशी, पाककला व महिला मंडळ अशा कित्येक व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे ज्येष्ठ महिलाही संवाद साधू लागल्या आहेत. घरगुती कार्यक्रम असो वा एखादी रेसिपी... याचे संपूर्ण शेअरिंग व्हॉट्‌सऍपद्वारे करत आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय असणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. ग्रुपमध्ये नाटकाचे परीक्षण, जुन्या मित्र-मैत्रिणी शोधण्याचे माध्यम, चित्रपटांवरील गप्पा, सहल व अनौपचारिक कार्यक्रमांचे नियोजन, सामाजिक बांधिलकी अशा विविध उपक्रमांसाठी ज्येष्ठ सोशल मीडियाचा वापर करत आहेत. उतारवयात आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची नवी ऊर्मी यातून मिळत आहे, तेही छायाचित्र-व्हिडिओच्या शेअरिंगमधून आणि संवादातून. 

''पुण्यात 5 लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. 157 ज्येष्ठ नागरिक संघ असून प्रत्येक संघात 250 हून अधिक सभासद आहे. या सर्वांना जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरले ते व्हॉट्‌सऍप. शहरात विविध ठिकाणी संघाचे गटानुसार व्हॉट्‌सऍप ग्रुप असून, सोशल मीडियाचा सहजपणे वापर करणारे ज्येष्ठ या ग्रुपमध्ये आहेत.''
- अरुण रोडे, अध्यक्ष, फेस्कॉम ज्येष्ठ नागरिक महासंघ 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com