#SocialRagging सोशल मीडियावरून रॅगिंग

Social-Ragging
Social-Ragging

पुणे - व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्याच महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याची छेड काढत असाल किंवा त्याला मानसिक त्रास देत असाल, तर सावधान..! सोशल मीडियावरून मानसिक छळ करताय म्हणून तुमच्यावर रॅगिंग केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो आणि तुमची चौकशी होऊ शकते. होय! पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षेआधीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड झाल्याचा प्रकार महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या लक्षात आला. त्याने पेपरफुटीबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली. त्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन करत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्याबरोबरच पेपर फुटलेल्या विषयांची फेरपरीक्षा घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात फेरपरीक्षा झाली.

दरम्यान, पेपरफुटीची तक्रार केल्याने फेरपरीक्षा द्यावी लागल्याने संतप्त झालेल्या महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यार्थ्याला सोशल मीडियावरून त्रास देण्यास सुरवात केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपमधूनही त्याला रिमूव्ह करण्यात आले. त्यानंतर ग्रुपवर त्या विद्यार्थ्याबाबत अपशब्द वापरत सातत्याने अपमान करण्यात येत होता.

दरम्यान, अशा प्रकारे मानसिक छळ झाल्याची तक्रार संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालयासह विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली. त्याच्या तक्रारीची दखल घेत महाविद्यालयाने विशेष समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. या समितीने रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची आतापर्यंत दोन टप्प्यांत चौकशी केली असून, चौकशीचा आणखी एक टप्पा बाकी आहे. त्यानंतर समिती महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीसमोर अहवाल सादर करेल, अशी माहिती महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

चौकशी समितीचा अहवाल २५ मार्चपर्यंत महाविद्यालयाकडे येईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक घेऊन त्यांना हा प्रकार त्वरित थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- वैजयंती जोशी, प्राचार्या, आयएलएस विधी महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com