भाजपच्या वाटेवर नक्की कोण, कोल्हे- आढळराव यांच्यात रंगले 'न्यूज वॉर'

adhalrao and kolhe.jpg
adhalrao and kolhe.jpg

शिरूर (पुणे) : राज्याच्या सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र अजिबातच पटेनासे झाले असून, दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या 'सोशल वॉर'नंतर आता डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या आजी- माजी खासदारांत खडाजंगी सुरू झाली आहे. दोघांनी एकमेकांच्या हातात कमळ देत परस्परांना भाजपची वाट दाखवली आहे. या नेत्यांनी नाकारले असले; तरी त्यांच्या भाजपच्या वाटेवरील बातम्या मतदारसंघातील सर्व रस्त्यांवर जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. 

कंगणा राणावत प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रथम शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित केली. त्यानंतर शिवसैनिकांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या अकार्यक्षमतेचा डंका एका चपखल व्यंग्यचित्राच्या माध्यमातून वाजविला. हे व्यंग्यचित्र चांगलेच झोंबलेल्या राष्ट्रवादीने मग जशास तसे उत्तराचा इशारा दिला. त्याला अर्थातच शिवसैनिक बधले नाहीत. मग काहीसे सबुरीने घेत प्रचारयंत्रणा आणि भेदनितीचा अवलंब करीत, शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर... अशा बातम्या पेरल्या गेल्या. वर्तमानपत्रांतील बातमीच्या मजकुराप्रमाणे डिझाईन करून राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयावरून व्हायरल झालेल्या या बातम्यांनी शिरूर मतदारसंघात खळबळ उडाली; तर शिवसैनिकांत चुळबूळ सुरू झाली. 'दादा भाजपात गेल्यावर आपल्याला वाली कोण,' असा संभ्रमही शिवसैनिकांत निर्माण झाला. 
    

सैरभैर झालेल्या शिवसैनिकांना काबूत आणण्यासाठी आता शिवसेनेनेही चंग बांधला असला; तरी त्यासाठी राष्ट्रवादीने चघळून चोथा केलेलाच मार्ग अवलंबला आहे. त्यांच्याकडूनही आता खासदार कोल्हे निघाले भाजपच्या वाटेवर, अशा मथळ्याखालील 'बनावट बातमी' चौफेर पसरविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या अपप्रचाराशी 'सामना' करण्याचे पुरेसं बळ शिवसैनिकांत असतानाही आता स्वाभिमानी म्हणविणाऱ्या शिवसेनेलाही बोगसगिरीचाच आधार घ्यावा लागला आहे. यातून खासदार डॉ. कोल्हे गटाने आढळराव गटावर काहीशी कुरघोडी केल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचा सोशल सेल डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ समरसून कामाला लागला आहे. 

राष्ट्रवादीच्याच चार आमदारांनी हैराण केल्याने खासदार कोल्हे हे मतदारसंघात फिरेनात, अशी टीप्पण्णी शिवसेनेने व्हायरल केलेल्या वृत्तात केली असली, तरी हे चार आमदार कोण, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. मुळात 'खासदार डॉ. कोल्हे हे मतदारसंघात फिरत नाहीत, ते गायब आहेत,' अशी टीका शिवसेनेने व शिवसेनेच्या उपनेत्याने केली होती. परंतु, डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघात इतर आमदारांना डावलून चांगलाच जम बसविला आहे. औद्योगीकरणात कामाचे ठेके मिळवले आहेत, अशी तक्रारही केली आहे. मग एवढी मोठी कामे करताना आणि ती मिळवण्यासाठी पाठपुरावा करायला तरी ते येथे आले असतीलच ना, याचा शिवसेना नेत्यांना विसर पडला की काय, अशी खपली राष्ट्रवादीच्या तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर काढली.  

दरम्यान, आढळराव पाटील यांनी या सर्व प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, केंद्र सरकारच्या विरोधातील आमचे कांदा आंदोलन जिल्ह्यात यशस्वी झाल्याने सर्वसामान्य जनतेचे लक्ष त्यावरून इतरत्र वळविण्यासाठी खासदारांच्या चमच्यांनी हा नवा उद्योग सुरू केला असल्याचा आरोप केला. माझ्याविषयी खोटी माहिती पसरवून तुम्ही आता मतदारसंघातील जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, असे सांगताना करमणूक आणि कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासाने लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी, असा अनाहूत सल्लाही त्यांनी खासदार  कोल्हे यांना दिला. मला बदनाम करण्यासाठी भाजप प्रवेशाच्या कंड्या पिकवल्या जातात. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या वरिष्ठांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याने तुमच्या काड्यांनी मला काहीच फरक पडणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com