आठवड्याची सुट्टी निसर्गाला समर्पित करणारी सैराट टीम

दत्ता म्हसकर
रविवार, 1 जुलै 2018

सोनावळे ता.जुन्नर येथील सैराट टीमच्या सदस्यांनी ऐतिहासिक दाऱ्याघाट-आंबोली ता.जुन्नर येथील पर्यटनस्थळी जाऊन शनिवारी ता.३० रोजी स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठया संख्येने प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या आदी गोळा करून नष्ट करण्यात आले. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता वेतन घेऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही घटना,अशाच प्रकारचे काम ही मुले सातत्याने करत आहेत.

जुन्नर : 'निसर्ग आहे म्हणून मानव आहे' अशी धारणा असणारे सोनावळे ता.जुन्नर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सैराट टीमचे खरोखर कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. 

सोनावळे ता.जुन्नर येथील सैराट टीमच्या सदस्यांनी ऐतिहासिक दाऱ्याघाट-आंबोली ता.जुन्नर येथील पर्यटनस्थळी जाऊन शनिवारी ता.३० रोजी स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठया संख्येने प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या आदी गोळा करून नष्ट करण्यात आले. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता वेतन घेऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही घटना,अशाच प्रकारचे काम ही मुले सातत्याने करत आहेत.

या मुलांना गेली दोन वर्षे वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. वनविभागाच्या तसेच खासगी वनास लागलेले वनवे रात्री-अपरात्री विझविणे, विविध वृक्षाचे बिया जमा करून पावसाळ्यात त्या बियांचे रोपण करणे, वटवृक्षाचे फांद्या लावणे आदी कामे या टीमची सतत सुरू असतात. 

विशाल बोऱ्हाडे, समिर डामसे, प्रतिक बोऱ्हाडे, ओंकार बोऱ्हाडे, रोहन बोऱ्हाडे, हर्ष भवारी, यश भवारी, सागर बोऱ्हाडे, कुंदन बोऱ्हाडे, प्रविण डामसे, विशाल बोऱ्हाडे, रमेश निगळे ही सैराटची टीम जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विविध पर्यटनस्थळी सातत्याने स्वच्छता अभियान राबवित असते. विशेष म्हणजे ही सर्व मुले ही इयत्ता ५ ते ९ वर्गात शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबर आठवड्याच्या सुट्टीत ते निसर्गाशी एकरूप होऊन जे काम करतात ते खरोखर उल्लेखनीय नवे तर कौतुकास पात्र आहेत.

Web Title: social work in Junnar