निर्मलाताईंचे काम त्यागातून - प्रताप पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

'सामाजिक क्षेत्रातील काम निर्मलाताईंनी अगदी कौटुंबिक जबाबदारीसारखे पार पाडले. त्यागी वृत्ती, उत्साह आणि काम करण्याची प्रबळ इच्छा यातूनच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाजसेवेचा ध्यास घेतला होता,'' असे मत विद्यार्थी साहाय्यक समिती आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार यांनी व्यक्त केले.

पुणे - 'सामाजिक क्षेत्रातील काम निर्मलाताईंनी अगदी कौटुंबिक जबाबदारीसारखे पार पाडले. त्यागी वृत्ती, उत्साह आणि काम करण्याची प्रबळ इच्छा यातूनच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाजसेवेचा ध्यास घेतला होता,'' असे मत विद्यार्थी साहाय्यक समिती आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉ. आपटे वसतिगृहात सभेचे आयोजन केले होते, या वेळी ते बोलत होते. "वनस्थळी'च्या विश्‍वस्त माणिक कोतवाल, फ्रान्स मित्रमंडळाचे विश्वस्त डॉ. सतीश देसाई, भारती भिडे आणि पुरंदरे कुटुंबीयांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वनस्थळी, विद्यार्थी साहाय्यक समिती आणि फ्रान्स मित्रमंडळ या संस्थांच्या रचनात्मक उभारणीचे काम पुरंदरे यांनी केले होते. डॉ. देसाई म्हणाले, 'ताईंचा स्वभाव हा परखड होता. व्यक्तीची क्षमता आणि योग्यता बघूनच ते जबाबदारी देत. किल्लारी भूकंपाच्या वेळी ताईंच्या आवाहनामुळे परदेशांतूनही मदत जमा झाली. माझा शब्द हा लोकांपर्यंत जायचा मार्ग आहे, अशी शिकवण देणाऱ्या ताईंनी स्वाभिमानाने माणूस म्हणून जगायला शिकवले.''

समाजाकडे बघताना झापड लावून बघू नका, तर समग्र दृष्टीने बघा, असे ताईंनी शिकवल्याची भावना माजी विद्यार्थिनी पुष्पा थोरात यांनी व्यक्त केली. समाजसेवेच्या यज्ञकुंडात जीवन समर्पित करणाऱ्या ताईंनी महिलांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवले, असे मत कोतवाल यांनी व्यक्त केले. रमाकांत तांबोळी, प्रकाश दीक्षित यांनी ताईंबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रभाकर पाटील यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Worker Nirmala Purandare Work Pratap Pawar