#SocietiesIssue फ्लॅट नावावर; पण जमिनी बिल्डरांच्या ताब्यात

SocietiesIssue
SocietiesIssue

पुणे - राज्य सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्याचा निर्णय घेतला; पण जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. शिवाय, विकसकांची टाळाटाळ आणि गृहनिर्माण संस्थांची उदासीनता ही कारणेही आहेत. परिणामी, शहरातील निम्म्याहून अधिक गृहनिर्माण संस्थांमध्ये फ्लॅट सभासदांच्या नावावर झाले; पण मूळ जमिनी बिल्डरांच्याच ताब्यात असल्याचे चित्र आहे.

बिल्डरने फ्लॅटच्या विक्रीनंतर त्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी आणि जमिनीच्या मालकी हक्‍काचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे; परंतु काही बिल्डरांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर कधी कधी बिल्डर पाठीमागे लागूनही संस्थेच्या सभासदांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. राज्य सरकारने कागदपत्रांची क्‍लिष्टता दूर करण्याचा निर्णय घेतला; परंतु जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अतिरिक्‍त कागदपत्रांची मागणी केली जाते. तेथे अर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा मुद्रांक व नोंदणी विभागात प्रस्ताव प्रलंबित राहत असल्याची हाउसिंग सोसायट्यांच्या सभासदांची तक्रार आहे. 

दरम्यान, सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या तुलनेत गृहनिर्माण संस्था अधिक आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदा आणण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने विधी व न्याय विभागाकडे अहवाल पाठविला आहे. त्याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

डीम्ड कन्व्हेयन्सची सद्य:स्थिती (पुणे आणि पिंपरी-चिंचवड)
  सहकारी गृहनिर्माण संस्था    १६ हजार ३७०
  डीम्ड कन्व्हेयन्स झालेल्या संस्था    सुमारे १६६०
  दाखल प्रस्ताव    ५० ते ६०
  डीम्ड कन्व्हेयन्सचे प्रमाण    सुमारे ११ टक्‍के

काय होणार फायदा 
  पंधरा हजार गृहनिर्माण संस्थांना लाभ होणार 
  जमिनीची मालकी गृहनिर्माण संस्थेच्या नावावर 
  गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासामधील अडचणी दूर होतील

डीम्ड कन्व्हेयन्ससाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदा करून ही प्रक्रिया आणखी सोपी करावी. १२ वर्षे पूर्ण झालेल्या गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्सऐवजी थेट प्रापर्टी कार्डवर सभासदांचे नाव लावावे. तसेच सहकार विभागाने संस्थांच्या सभासदांसाठी प्रशिक्षण मेळावे घ्यावेत. 
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com