तीन सोसायट्या चकाचक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

मोहिमेचा फायदा
रहिवाशांना स्वच्छतेचे धडे
आरोग्याचे प्रश्‍न मार्गी
बकालपणा दूर होणार
जीवनमानही उंचावणार

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गोळा करण्याचे काम ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमामुळे तीन गृहनिर्माण सोसायट्यांचे रूप पालटले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जाते. विकसकांच्या माध्यमातून हे पुनर्वसन होते. परंतु, इमारत पूर्ण झाल्यानंतर सोसायटी स्थापन केली जाते. ती रहिवाशांच्या ताब्यात घेऊन विकसक निघून जातो. नंतर रहिवाशांकडून देखभाल केली जात नाही. त्यामुळे मोकळ्या जागेत कचरा टाकणे, जिन्यामध्ये अस्वच्छता, असा बकालपणा येतो.

त्यातून आरोग्याचे प्रश्‍नही निर्माण होतात. केवळ पुनर्वसन केल्यानंतर रहिवाशांच्या जीवनात फरक पडत नाही. त्यामुळे सोसायट्यांना पुन्हा झोपडपट्टीचे स्वरूप येते. ही बाब ओळखून रहिवाशांना आरोग्यासह सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी प्राधिकरणाने ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कात्रज येथील लेक टाऊन, राजेंद्रनगर येथील सर्व्हे नंबर १००४ आणि भवानी पेठ येथील मंजूबाई चाळ या सोसायट्यांत स्वच्छता मोहीम राबविली. रहिवाशांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रशिक्षण दिले. दररोज ‘स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो गोळाही केला जात आहे. त्यासाठी दरमहा कर्मचाऱ्यांना प्राधिकरणाकडून पैसे मोजण्यात येतात.

झोपडपट्टीचे पुनर्वसन म्हणजे केवळ इमारत बांधून देणे, एवढा मर्यादित विचार न करता रहिवाशांना आरोग्य, स्वच्छता, शैक्षणिक आणि कौशल्यविकासाबरोबरच व्यसनमुक्तीचे प्रशिक्षण देऊन त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारणे, हादेखील विचार आहे. या विचाराने प्राधिकरणाने स्वतःहून पुढाकार घेऊन प्रायोगिक तत्त्वावर स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यातून रहिवाशांबरोबरच अन्य पुनर्वसित सोसायट्यांसमोर आदर्श निर्माण झाला आहे.
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

सोसायटीत यापूर्वी प्रचंड कचरा साठला होता. घरात जातानाही रुमाल बांधून जावे लागत होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आठ ते दहा दिवसांपासून दररोज घरोघरी ‘स्वच्छ’चे कर्मचारी येतात व कचरा घेऊन जातात. तसेच, सोसायटीच्या जिना आणि परिसराची साफसफाई करतात, त्यामुळे खूपच फरक पडला आहे.
- आयुब बशीर शेख, रहिवासी, मंजूबाई चाळ, भवानी पेठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Society Cleaning Campaign Slum Rehabilitation