वाघोलीत कचरा विरोधात सोसायटीधारक रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

वाघोली : पुणे नगर महामार्गालगत मनशा सोसायटी समोरील मोकळ्या जागेत सध्या ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त मनशा सोसायटी धारकांनी आज या मैदानावर भर पावसात ठिय्या आंदोलन करून कचरा टाकणाऱ्या घंटा गाड्या रोखल्या. येथे कचरा टाकू नये अशी मागणी सोसायटी धारकांनी केली आहे.

वाघोली : पुणे नगर महामार्गालगत मनशा सोसायटी समोरील मोकळ्या जागेत सध्या ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त मनशा सोसायटी धारकांनी आज या मैदानावर भर पावसात ठिय्या आंदोलन करून कचरा टाकणाऱ्या घंटा गाड्या रोखल्या. येथे कचरा टाकू नये अशी मागणी सोसायटी धारकांनी केली आहे.

नियोजनाच्या अभावामुळे सुमारे वर्षांपासून कचऱ्याची गंभीर समस्या वाघोलीत जाणवत आहे. कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने सर्वत्र कचरा अशी स्थिती झाली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही तर, दुसरा बंद झाला. नवीन प्रकल्प सुरू होईपर्यंत तात्पुरता कचरा टाकण्यासाठी काही जागा शोधण्यात आल्या. मात्र, तेथे विरोध झाला व होत आहे. सध्या पुणे नगर महामार्गावर मनशा सोसायटी समोरील मोकळ्या जागेत कचरा टाकला जात होता. मात्र त्याची दुर्गंधी व जाळण्यात आल्यामुळे धुराच्या होणाऱ्या त्रासाने तेथील सोसायटी धारकांनी कचरा टाकण्यास विरोध केला. तसे पत्र अनेकवेळा ग्रामपंचायतीला दिले. मात्र तरीही तो टाकला जात असल्याने सोसायटी धारकांनी तेथील मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन करीत कचऱ्याच्या घंटा गाड्या येऊ दिल्या नाहीत. कचरा टाकणे बंद करावे, तेथे औषध फवारणी करावी, अशी मागणी करीत काही उपाययोजना नागरिकांनी ग्रामपंचायतीला सुचविल्या आहेत. 

''या कचऱ्यामुळे सोसायटीतील नागरिकांना दुर्गंधीचा खूप त्रास होतो. ग्रामपंचायतीला अनेक वेळा पत्र देऊन टाकू नये अशी विनंती केली आहे. मात्र तरीही तो टाकला जात असल्याने आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर आली. येथे कचरा टाकू नये अशी आमची मागणी आहे.''
 - अरीत सिन्हा, मनशा सोसायटीधारक.

''नवीन प्रकल्पा बाबत प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकी नंतर त्याला गती येईल. तो पर्यंत दोन तीन ठिकाणी कचरा टाकावा लागणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येईल.''
- मधुकर दाते, ग्रामविकास अधिकारी, वाघोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Society holders protest against waste in Wagholi