#savewater पाणीबचतीसाठी सोसायट्यांचा पुढाकार

#savewater पाणीबचतीसाठी सोसायट्यांचा पुढाकार

पुणे - भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाण्याच्या संकटाचा अंदाज घेऊन शहरातील काही रहिवासी सोसायट्यांनी पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. पर्जन्यजल संचयाच्या माध्यमातून एक सोसायटी वर्षाला सुमारे सहा लाख लिटरपर्यंत पाणी वाचवत आहे. पावसाचे पाणी वाया न घालवता त्याचा पुनर्वापरही केला जात आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

इमारतींच्या गच्चीवर पडणारे पाणी पाइपच्या मदतीने बोअरवेलमध्ये सोडण्यात येते. यामुळे पाणीबचतीचा दुहेरी फायदा होतो. पहिला म्हणजे बोअरवेलचे पाणी वर्षभर कमी पडत नाही. दुसरा पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत असल्याने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. स्वच्छतागृह आणि इतर कामांसाठीही हे पाणी वापरता येत असल्यामुळे महापालिकेच्या पाण्याचीही बचत होते. पाणीबचतीच्या या उपाययोजनेसाठी फार मोठ्या पायाभूत सुविधांची गरज भासत नाही. कर्वेनगरमधील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीमध्ये चार वर्षांपासून याची अंमलबजावणी सुरू आहे. या उपायांमुळे त्यांनी लाखो लिटर पाण्याची बचत केली आहे. कोथरूडमधील आनंद रेसिडेन्सी, येरवडा भागातील हरिगंगा सोसायटीसह वारजे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आदी भागांतील अनेक रहिवासी सोसायट्यांनी पाणी बचतीची ही उपाययोजना अमलात आणली आहे.      

ठळक मुद्दे...
दरवर्षी प्रत्येक सोसायटीकडून लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते
महापालिकेच्या पाण्याचीही बचत होते
पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापर शक्‍य
या उपाययोजनांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज नाही
पाणी वाचविणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या मिळकतकरात पाच टक्के सवलत मिळते

जूनच्या पहिल्या आठवड्यातच आम्ही पाइपलाइनचे काम पूर्ण केले आहे. सोसायटीमध्ये तीन बोअरवेल आहेत. यंदा पाऊस जरी कमी पडला असला, तरी गच्चीवरील पाणी अडवून ते बोअरवेलमध्ये सोडल्यामुळे बोअरवेल भरल्या आहेत. या माध्यमातून किमान ६ लाख लिटर पाणी दरवर्षी वाचत असल्याचा आमचा अंदाज आहे. यंदा आम्हाला वॉटर टॅंकरची गरज भासणार नाही. महापालिकेचे पाणी कमी पडले, तरी आम्हाला चिंता नाही.
- दत्ताराम संसारे, आनंद रेसिडेन्सी, कोथरूड

गच्चीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत प्रत्येकाच्या स्वच्छतागृहामधील फ्लशची सेटिंग केली आहे. बऱ्याचदा फ्लॅश केल्यामुळे खूप पाणी वायाला जाते. आमच्या सोसायटीतील १९ इमारतींमध्ये ९०५ कुटुंब राहतात. या सर्वांच्या घरातील फ्लशमुळे वाया जाणारे पाणी नियंत्रणात आणले आहे.
- संजय पोळ, हरिगंगा सोसायटी, येरवडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com