समाजाने दिव्यांगांसोबत मैत्री करावी : महाजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- समाजाने दिव्यांग व्यक्तींवर दया दाखवणे बंद करून त्यांच्याशी मैत्री करावी.

- सक्षम होण्यासाठीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

पुणे : समाजाने दिव्यांग व्यक्तींवर दया दाखवणे बंद करुन त्यांच्याशी मैत्री करावी. कायम मदत नको तर विशिष्ट कालावधीनंतर ती बंद करून सक्षम होण्यासाठीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

जागतिक अपंग दिनानिमित्त आज (मंगळवार) दीपस्तंभ फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'मनोबल' या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विनामूल्य निवासी स्पर्धापरीक्षा केंद्रात दीपस्तंभ संस्थापक महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले, समाजाने दिव्यांग व्यक्तींवर दया दाखवणे बंद करुन त्यांच्याशी मैत्री करावी. कायम मदत नको तर विशिष्ट कालावधीनंतर ती बंद करून सक्षम होण्यासाठीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. फार कौतुक करू नका पण हेटाळणीही करु नका. दिव्यांग व्यक्तींनीही सतत दुःख करु नका. जीवनाच्या मोठ्या कॅनव्हासमधला अपंगत्व हा छोटासा ठिपका आहे हे समजून स्वीकार करा. हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवा. यशस्वी व्हायचे ते क्षमतांवर अपंगत्वावर नव्हे. स्वतः घेतलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून नंतर इतरांच्या मदतीला धावून जा".

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीआयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजेश ढाके होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना जागतिक अपंग दिनाच्या शुभेच्छा देत यानंतर सोबत असण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला मनोबल प्रकल्पाचे मंजुश्री कुळकर्णी, सुमित मोरे, सीमा सावंत आणि अक्षय कोठावडे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Society peoples should Friendship with Handicapped Peoples says Yajuvendra Mahajan