सोसायट्यांना टॅंकरचेच पाणी

पीतांबर लोहार
बुधवार, 16 मे 2018

पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून, दागिने मोडून सदनिका घेतल्या. हक्काचे घर म्हणून मिळाले या आनंदात राहायला आले. महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागामालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती चिखली-मोशी परिसरातील बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील आहे.

पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून, दागिने मोडून सदनिका घेतल्या. हक्काचे घर म्हणून मिळाले या आनंदात राहायला आले. महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागामालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती चिखली-मोशी परिसरातील बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील आहे.

चिखली-मोशीदरम्यान देहू-आळंदी रस्ता आणि इंद्रायणी नदी या पट्ट्यात अनेक गृहनिर्माण प्रकल्प साकारले आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेने जलवाहिन्या टाकल्या आहेत. नळजोड दिलेले आहेत. मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोसायट्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

उदाहरण १
स्वराज रेसिडेन्सी सोसायटी. एकूण सदनिका ६२२. पाण्याची दररोजची गरज तीन लाख ५० हजार लिटर. महापालिकेचा होणारा पाणीपुरवठा केवळ ७ ते ८ हजार लिटर. प्रतिसदनिका पाणीपुरवठा कर १ हजार ३१२ रुपये. सर्व सदनिका मिळून दरवर्षी भरला जाणारा कर आठ लाख पाच हजार ६४ रुपये. खासगी दोन व्यक्तींकडून बोअरवेलचे पाणी घेतले जाते. त्याचा दरमहा खर्च ९० हजार रुपये. वर्षाला एक कोटी आठ लाख रुपये. 

उदाहरण २
अंजनी गाथा गृहनिर्माण सोसायटी. एकूण सदनिका २२४. दररोज पाण्याची गरज सुमारे १.५ लाख लिटर. महापालिकेचा पाणीपुरवठा दररोज केवळ दीड ते दोन तास. दररोज चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा. वापरासाठी पाणी हवे असल्यास एका टॅंकरचे भाडे ८५० रुपये. चार टॅंकरचे ३४०० रुपये. दरमहा १ लाख २ हजार रुपये. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रतिटॅंकर २ हजार २०० रुपये भाडे मोजावे लागते. 

उदाहरण ३
पर्ल्स क्रिस्टल सिटी सोसायटी. एकूण सदनिका २८८. दररोज पाण्याची गरज सुमारे २.५ लाख लिटर. महापालिकेकडून पाणीपुरवठा दररोज ८० ते ९० हजार लिटर. पुरेसे पाणी मिळावे यासाठी खासगी टॅंकरद्वारे पाणी मागवावे लागते. दररोज सुमारे चार टॅंकर पाणी लागते. एका टॅंकरचे भाडे ६०० रुपये द्यावे लागते. चार टॅंकरचे मिळून दररोज २ हजार ४०० रुपये भाडे द्यावे लागते.

आमच्या सोसायटीसाठी दोन इंच व्यासाचे ११ नळजोड घेतले आहेत. दररोज कमी दाबाने पाणी येते. गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. जलवाहिनी फुटल्याचे अधिकारी सांगतात. मात्र अद्याप दुरुस्ती झालेली नाही. 
- विजय आवटे, पदाधिकारी, स्वराज रेसिडेन्सी सोसायटी

चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. तेथून देहू-आळंदी रस्ता व इंद्रायणी नदी या पट्ट्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल.   
- विशाल कांबळे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: society water supply by tanker