पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र - फुंडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

पुणे - शेतकऱ्यांना माती परीक्षण सहज करता येणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये शेतीच्या इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली.

पुणे - शेतकऱ्यांना माती परीक्षण सहज करता येणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये शेतीच्या इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली.

"विवेक'संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "कृषी आणि पशुसंवर्धन कोशा'चे प्रकाशन फुंडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कोशाचे संपादक डॉ. द. र. बापट, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू चारुदत्त मायी, राजेंद्र बारवाले आणि "विवेक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. बापट यांनी शब्दकोशाच्या निर्मितीचा आढावा घेतला.

राज्यातील शेतीला प्रगतिपथावर नेऊन शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कोणते निर्णय घ्यावेत, याबाबत तज्ज्ञांनी सरकारला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही फुंडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'खासगी कंपन्या मार्केटिंगच्या जोरावर आपली उत्पादने अव्वाच्या सव्वा भावात शेतकऱ्यांच्या माथी मारतात. शेतकऱ्यांना सखोल ज्ञान नसल्यामुळे दुकानदारांवर विश्‍वास ठेवून महागडी कीटकनाशके, औषधे, खते याचा शेतीत मारा केला जातो. त्यामुळे शेतीचा पोतही बिघडत चालला आहे. यामुळे प्रत्येक पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. तेथे शेतकऱ्याने आपल्या शेतातील माती आणल्यानंतर तपासून मिळेल. त्यासोबत मातीचे "हेल्थ कार्ड'ही शेतकऱ्यांना दिले जाईल. यामुळे शेतात कधी, कोणते पीक घ्यायचे, कोणते बियाणे, खते आणि कीटकनाशके वापरावयाचे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.'' आज सेंद्रिय शेती का मागे पडली आणि ग्रामीण भागातही पशुधन का दिसत नाही, याचा विचार करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: soil test center fore five villages