हडपसर लक्ष्मीकाँलनी ते शेवाळवाडी पर्यंतचा सोलापूर महामार्ग धोकादायक

कृष्णकांत कोबल
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मांजरी - वारंवार नजरेस आणून आणि तक्रारी करूनही येथील सोलापूर महामार्गाची दैन्यावस्था दूर होताना दिसत नाही. त्याबाबत स्वतः खासदारांनी वेळोवेळी सूचना देवूनही परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे येथील सुमारे दीड किलोमीटरचा महामार्ग धोकादायक बनला आहे. 

मांजरी - वारंवार नजरेस आणून आणि तक्रारी करूनही येथील सोलापूर महामार्गाची दैन्यावस्था दूर होताना दिसत नाही. त्याबाबत स्वतः खासदारांनी वेळोवेळी सूचना देवूनही परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे येथील सुमारे दीड किलोमीटरचा महामार्ग धोकादायक बनला आहे. 

रूंदीकरण झाल्यापासून येथील लक्ष्मीकॉलनी ते शेवाळवाडी या भागातील शहराकडे येणाऱ्या महामार्गावर वाळू व रेडीमिक्सची वाहतूक करणारी वाहने अवैधरित्या ऊभी राहत आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू व माती पसरलेली आहे. काही सोसायट्यांचे सांडपाणीही महामार्गावर येत आहे. त्याचा निचरा होत नसल्याने कायम येथे पाणी साचलेले दिसते. रात्रंदिवस येथे संपूर्ण रस्त्यावर मालवाहू वाहने पार्क केलेली असतात. या वाहनांच्या आडोशाने येथे मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जात आहे.  त्यावर कायम भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. पसरलेल्या वाळूमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना येथे घडत आहेत. साचून राहत असलेल्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा धोकाही निर्माण झाला आहे. कुत्र्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याशिवाय दुभाजकामध्ये लावल्या जात असलेल्या जाहिरातींमुळेही रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात सदृष्य परिस्थइती निर्माण होत असते. याबाबत स्वतः खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही त्यांच्याकडून खासदारांच्या सूचनेला हरताळ फासला जात आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी महामार्गावरील हे प्रश्र्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. 

""रोजच्या रोज आमच्याकडून येथील देखभाल करणे शक्य नाही. मात्र, येथील पार्किंग, कचरा व सांडपाण्याबाबत वाहतूक शाखा, ग्रामपंचायत, महसूल विभाग यांना पत्र दिले आहे. त्यांनी कारवाई बाबत गांभिर्याने घतल्यास हा प्रश्र्न मिटेल.''
गणेश चवरे
कार्यकारी अभियंता, हायवे विभाग.

""अनाधिकृतरित्या पार्किंग केल्या जात असलेल्या सर्व वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. यापुढेही दररोज संबंधीत ठिकाणी प्राधान्याने वाळू व रेडीमिक्सच्या वाहनांना पार्किंगसाठी मज्जाव केला जाईल.''
जगन्नाथ कळसकर
वाहतूक पोलीस निरिक्षक
 

Web Title: The Solapur highway from Hadapsar Laxmi colony to Shewalwadi is dangerous