अंधश्रद्धा न बाळगता सूर्यग्रहण पाहण्याची शपथ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सूर्यग्रहणाकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पाहिले पाहिजे, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी संडे सायन्स स्कूल संस्थेतर्फे आयोजित ‘स्वागत सूर्यग्रहणा’चे या कार्यक्रमात केले. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत रविवारी विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात हे आवाहन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी व पालकांनी ‘आम्ही अंधश्रद्धा न बाळगता सूर्यग्रहण पाहू’, अशी प्रतिज्ञा केली.

पुणे - सूर्यग्रहणाकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पाहिले पाहिजे, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी संडे सायन्स स्कूल संस्थेतर्फे आयोजित ‘स्वागत सूर्यग्रहणा’चे या कार्यक्रमात केले. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत रविवारी विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात हे आवाहन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी व पालकांनी ‘आम्ही अंधश्रद्धा न बाळगता सूर्यग्रहण पाहू’, अशी प्रतिज्ञा केली.

पुढील महिन्यात कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. १० वर्षांनी असे ग्रहण होणार आहे. असे ग्रहण पाहण्याची संधी पुन्हा लवकर मिळणार नाही. म्हणून त्याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी इस्रोचे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक, खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे, प्रदीप लोखंडे उपस्थित होते. पुणे शहर व परिसरातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

लोखंडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे काम केले पाहिजे. केवळ पाठांतर न करता सखोल वाचन केले पाहिजे. खेड्यातील विद्यार्थ्यांमध्येही आता खगोलशास्त्राबाबत मोठ्या प्रमाणावर आवड निर्माण होत आहे. मात्र, ती आवड जपण्यासाठी ग्रामीण भागात वाचनालयाची मोठ्या प्रमाणात गरज आहे.’’

डॉ. नाईक यांनी चांद्रयान मोहीम १, चांद्रयान मोहीम २, त्याचबरोबर पीएसएलव्ही अग्निबाण मोहीम, तसेच सूर्याच्या संशोधनासाठी राबवलेली ‘आदित्य मोहीम’ यावर सविस्तर माहिती दिली.

डॉ. तुपे म्हणाले, ‘‘सूर्यग्रहणाकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. २६ डिसेंबरला होणारे सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मीळ संधी आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ते पाहिले पाहिजे.’’ कार्यक्रमाचे आयोजन सुयश डाके, दिनेश निसंग व निकिता कुलकर्णी यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solar eclipse superstition Oath