कचऱ्यावर आज तोडगा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

ग्रामस्थांबरोबर महापौरांची बैठक; प्रकल्पांची क्षमता वाढविणार 

पुणे - फुरसुंगी, उरळी देवाची येथील ग्रामस्थ आणि महापालिका यांच्यात चर्चेच्या फेऱ्या होऊनही कचरा प्रश्‍नावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे कचरा डेपोला आग लागून दहा दिवस झाले, तरी शहरातील कचरा उचलला जात नाही; मात्र या संदर्भात ग्रामस्थांबरोबर मंगळवारी (ता. २५) चर्चा होणार असून, त्यात मार्ग निघेल, अशी आशा महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी (ता. २४) व्यक्त केली.

ग्रामस्थांबरोबर महापौरांची बैठक; प्रकल्पांची क्षमता वाढविणार 

पुणे - फुरसुंगी, उरळी देवाची येथील ग्रामस्थ आणि महापालिका यांच्यात चर्चेच्या फेऱ्या होऊनही कचरा प्रश्‍नावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे कचरा डेपोला आग लागून दहा दिवस झाले, तरी शहरातील कचरा उचलला जात नाही; मात्र या संदर्भात ग्रामस्थांबरोबर मंगळवारी (ता. २५) चर्चा होणार असून, त्यात मार्ग निघेल, अशी आशा महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी (ता. २४) व्यक्त केली.

फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोतील कचऱ्याला आग लागल्याने गेल्या दहा दिवसांपासून डेपोत कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. तसेच सातत्याने आगीच्या घटना घडूनही उपाययोजना केल्या जात नसल्याने कचरा टाकण्यास दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आग आटोक्‍यात येईपर्यंत कचऱ्याची एकही गाडी येऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी ती आटोक्‍यात येत नाही. त्यामुळे डेपोत कचरा टाकणे पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातच ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे; मात्र त्यात तोडगा निघत नाही. ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे; मात्र कचरा टाकू देण्यास ग्रामस्थ तयारी नाहीत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.   

आयुक्ताविना तोडगा निघेना 
महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त नसल्यानेच कचऱ्याच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप हेच ग्रामस्थांबरोबर चर्चा करीत आहे. मात्र महापालिकेतील अधिकारी चर्चेला पुढे का येत नाहीत, असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून आयुक्तांनी समक्ष चर्चा करावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

शहरात जमा होणारा कचरा उचलण्यात येत आहे. सध्या जे प्रकल्प सुरू आहेत, त्या ठिकाणी तो नेला जात असून, प्रकल्पांची क्षमता वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधित खात्याला केल्या आहेत. त्यामुळे जे प्रकल्प काही कारणांमुळे बंद आहेत, ते कार्यान्वित करण्याच्या हालचाली करण्यात येत आहेत. कचरा डेपोची आग आटोक्‍यात आणण्यासाठी पूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. ती आटोक्‍यात येत आहे. त्यामुळे कचरा टाकण्याचा प्रयत्न आहे; मात्र ग्रामस्थांचा विरोध असून, त्यावर चर्चा केली जात आहे. याबाबत दोनदा सकारात्मक चर्चा केली आहे.
- मुक्ता टिळक, महापौर

Web Title: solution on garbage