दमदार पावसामुळे मावळात भातलावणीला वेग

दमदार पावसामुळे मावळात भातलावणीला वेग

सोमाटणे - पावसाच्या उघडिपीमुळे पवनमावळात भातलावणीला वेग आला आहे.

गेले आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवनमावळ पूर्व भागातील भातलावण्या रखडल्या होत्या. परंतु काल दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे. पाऊस उघडताच पूर्व भागातील कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, आढले, डोणे, शिवली, येलघोल, थुगाव, आर्डव, मळवंडी, शिवणे, पिंपळखुंटे, बेबडओहोळ, चांदखेड, परंदवडी, बऊर, आढे, ओझर्डे, सडवली, उर्से, सोमाटणे, शिरगाव, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे, दारुंब्रे, सांगवडे, गहुंजे आदी गावातील शेतकऱ्यांनी भातलावणीला सुरवात केली. सध्या भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.

येत्या आठवडाभरात पवनमावळातील भातलावणीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती कुसगाव येथील शेतकरी बाळासाहेब केदारी यांनी दिली. यावर्षी पवनमावळातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने चारसूत्री भातलावणी पद्धतीचा वापर केला आहे.

रावेत, पुनावळे शिवारात लगबग

रावेत - रावेत, पुनावळे, किवळे भागांत सध्या सर्वत्र भात लागवडीची लगबग सुरू आहे. 

जूनमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने भाताच्या रोपांची चांगली वाढ झालेली आहे. मात्र जुलै महिना उजाडल्यापासून मात्र पावसाने दडी मारली आहे. म्हणून सध्या विद्युत पंपाने पाणी देऊन शेतकऱ्यांनी भाताची लागवड सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना पुनावळ्यातील शेतकरी संभाजी शिंदे म्हणाले, ‘‘या भागात मोठ्या प्रमाणात इंद्रायणी हे भाताचे पीक घेतले जाते. त्याचे उत्पन्न शेतकऱ्यांना चांगले मिळत असते.

पण दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे.’’ शहरीकरणाने मजुरीचे दरही वाढले असून, शेतात कष्टाचे काम करण्यासाठी मजुरांची समस्याही दिवसेंदिवस शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. भाताची वेळेत लागवड करण्याची गरज असल्याने शेतकरी जादा पैसे मोजून लागवडीचे काम करून घेत आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतच चालला आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला व नंतर पावसाने चांगलीच ओढ दिल्याने भाताची लागवड विद्युत पंपाच्या पाण्यावर सुरू केली आहे.

तरी सध्या चांगल्या पावसाची गरज परिसरातील भाताच्या, सोयाबीनच्या व उसाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे. पुढील काही दिवस पावसाने अशीच ओढ दिल्यास त्याचा भाताच्या पिकावर परिणाम होण्याची भीती आहे.

लावणी रखडली
कामशेत - कामशेतसह नाणे मावळात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने काही भागात भात लावण्या रखडली आहे. नदीच्या पाण्यावर वाढ झालेल्या भात रोपांची काही भागात भात लागवड झाली. नाणे, गोवित्री, करंजगाव, कांब्रे, मोरमारवाडी, पाले या भागातील शेतामध्ये पाणी असणाऱ्या ठिकाणी लागवड सुरू आहे. काही शेतकऱ्यांची लागवड रखडली आहे. वडिवळे धरण परिसरात एकूण पाऊस ९०७ मिलिमीटर झाला असून धरणात पाण्याचा साठा ३२.५० आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com