सोमाटणे नाक्‍यावरील यंत्रणा ‘फास्टच’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

फास्टॅग अंमलबजावणीमुळे काही अपवाद वगळता वाहनचालक आणि टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांतील हुज्जत, वादविवाद कमी झाले आहेत. फास्टॅगमुळे चांगली आणि तत्पर सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावत आहे. कोंडी आणि वेळेबरोबरच इंधन बचतीसाठी वाहनधारकांनी फास्टॅग लावून सहकार्य करावे.
- संदीप जाधव, व्यवस्थापक, सहकार ग्लोबल, सोमाटणे

तळेगाव स्टेशन - पुणे-मुंबई महामार्ग क्रमांक चारवरील सहकार ग्लोबल संचलित सोमाटणे (ता. मावळ) टोलनाक्‍यावर अद्याप फास्टॅग सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र येथील यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून आदेश न झाल्याने फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी मात्र अद्याप सुरू झालेली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमाटणे टोल नाक्‍यावर असलेल्या एकूण दहा लेनवर फास्टॅग स्कॅनर बसविण्यात आले असून, दोन पोर्टेबल स्कॅनरही कार्यरत आहेत. फास्टॅगच्या वाहनांचे प्रमाण वाढत असून, बॅलन्स अथवा टॅग उपलब्ध नसल्यास रोख स्वरूपात टोलवसुली सुरू आहे. सक्तीचा आदेश नसल्याने वाहनधारकाने फास्टॅग लावला नसल्यास जादा दर आकारला जात नाही. लेनच्या संख्या अधिक असल्याने फास्टॅग स्कॅनिंग होऊन निर्धारित तीन सेकंदांत वाहने पुढे जातात. त्यामुळे कोंडी कमी झाली आहे.

द्रुतगती मार्गावरील वाहतूक सोमाटणेमार्गे वळविल्यास फास्टॅग विरहित वाहनांमुळे काहीशी कोंडी होते. सोमाटणे टोलनाक्‍यावर फास्टॅगसंबंधित मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. याबरोबरच सहकार ग्लोबलचे कर्मचारीही फास्टॅगबाबत वाहनधारकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करतात. स्कॅनिंगपासून चोवीस तासांच्या वैधतेचा फायदा परत फिरुन येणाऱ्या वाहनधारकांना होत आहे. याशिवाय रिटर्न टोलची सवलत कायम आहे.

दहा किलोमीटरमधील रहिवासी खासगी वाहनधारकांना (व्हाइट प्लेट) २५ टक्के दरात केवळ २६० रुपयांची मासिक पासची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय वाणिज्य वापराच्या वाहनासाठी (यलो प्लेट) पन्नास टक्के दरात केवळ ५२५ रुपयांचा मासिक पास फास्टॅगच्या माध्यमातून उपलब्ध आहे. यासाठी फास्टॅगधारकांनी २४ अंकी हॅशटॅगची टोलनाक्‍याच्या कार्यालयातील मासिक पास काऊंटरला नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून पूर्ण टोल दराची रक्कम वजा होणे स्थानिकांना टाळता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: somatane toll naka system fast