'सोमेश्‍वर' घेणार साखरवाडीचा कारखाना

संतोष शेंडकर ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

फलटण (जि. सातारा) तालुक्‍यातील साखरवाडी साखर कारखाना घेऊन "सोमेश्वर'ची दुसरी शाखा सुरू करायची, असा विचार आहे. ते फायद्याचे होणार नसेल, तर "सोमेश्‍वर'च्या विस्तारवाढीचा विचार करू

 अजित पवार यांचा सभासदांपुढे प्रस्ताव; कारखान्याच्या गाळप हंगामास सुरुवात

सोमेश्वरनगर (पुणे) : ""फलटण (जि. सातारा) तालुक्‍यातील साखरवाडी साखर कारखाना घेऊन "सोमेश्वर'ची दुसरी शाखा सुरू करायची, असा विचार आहे. ते फायद्याचे होणार नसेल, तर "सोमेश्‍वर'च्या विस्तारवाढीचा विचार करू,'' असा प्रस्ताव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासद शेतकऱ्यांपुढे मांडला.

येथील सोमेश्वर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ व गव्हाणपूजनाचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते रविवारी झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते होते.

या प्रसंगी आमदार दत्तात्रेय भरणे, संजय जगताप, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांच्यासह सतीश काकडे, रामचंद्र भगत, रघुनाथ भोसले, बबन टकले, डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रमोद काकडे, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, संग्राम सोरटे, भाऊसाहेब करे, माणिक झेंडे, दत्ता झुरंगे, प्रदीप पोमण, अमृता गारडे, नीता फरांदे, मेनका मगर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""रामराजे नाईक-निंबाळकर व इतरांची मध्यस्थी घेऊन साखरवाडी कारखाना (ता. फलटण, जि. सातारा) घेऊन "सोमेश्वर'चे युनिट क्रमांक दोन करण्यासाठी प्रयत्न करू. सभासदांना विचारून ते फायद्याचे होणार नसेल, तर आपल्याला विस्तारवाढीचा विचार करावा लागेल. "सोमेश्वर'ने कच्च्या साखरेची निर्मिती करून निर्यातीवर भर द्यावा, बी हेवी मोलासेसपासून अधिकचे इथेनॉल तयार करावे.''

डिस्टिलरीची विस्तारवाढ, कामगार वसाहतीचे बांधकाम आणि दीपावलीला जादा साखरवाटप, या कामांबद्दलही पवार यांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आभार मानले.

 "केंद्राने अधिकची मदत करावी'
शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान आणि राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्‍टरी आठ हजारांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आदी खर्च कसा भागणार? यासाठी पुन्हा राज्यपालांकडे शिष्टमंडळ नेऊन मदतवाढ करण्याची विनंती करू, तसेच केंद्र सरकारने अधिकची मदत करावी, असाही आग्रह धरू, असे अजित पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Someshwar' will take up a sugar factory in Sakarwadii