सोमवार पेठेत वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

पुणे - वाहनांची तोडफोड अन्‌ जाळपोळीच्या घटनांचे लोण आता उपनगरांकडून शहराच्या मध्यवस्तीतही पसरू लागले आहे. सोमवार पेठेत गुरुवारी पहाटे टोळक्‍याने दहशत निर्माण करून रहिवाशांच्या दुचाकी अन्‌ कारची तोडफोड केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नितीन शंकरराव शिंदे (वय 48, रा. तुळसाराम बिल्डिंग, सोमवार पेठ, नागेश्‍वर मंदिराजवळ) यांनी फिर्याद दिली. त्यांच्यासह परिसरातील रहिवासी त्यांची वाहने घरासमोरील रस्त्यावर लावतात.

बुधवारी त्यांनी वाहने रस्त्यावर लावली होती. दरम्यान, गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता सहा ते सात जणांचे टोळके वेगवेगळ्या दुचाकींवरून सोमवार पेठेतील औदुंबर मंडळाजवळ आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करत शिंदे यांच्या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर रस्त्यावर लावलेली रिक्षा, टेम्पो, कारसह आठ दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर ते तेथून पळून गेले. दरम्यान, टोळक्‍याच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेनंतर टोळक्‍याने कसबा पेठेतील साततोटी चौकातही एका कारची तोडफोड केली.

दरम्यान कसबा पेठ, सदाशिव पेठेसह मध्यवर्ती भागामध्ये यापूर्वीही वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. असे असतानाही आरोपींना पकडून त्यांच्यावर पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

काही नागरिकांच्या कार, दुचाकी फोडल्याची तक्रार आमच्याकडे दाखल झाली आहे. घटना घडलेल्या ठिकाणाजवळील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींचा लवकरच शोध घेतला जाईल.
- बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Somvar Peth Vehicle Damage Crime