वानवडीतील कालव्यात पोहताना मुलगा बुडाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

घोरपडी - वानवडीतील सोलापूर रस्त्यालगत असलेल्या उजव्या कालव्यामध्ये पोहताना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास नऊ वर्षांचा मुलगा बुडाला. संध्याकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र तो आढळून आला नाही. 

घोरपडी - वानवडीतील सोलापूर रस्त्यालगत असलेल्या उजव्या कालव्यामध्ये पोहताना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास नऊ वर्षांचा मुलगा बुडाला. संध्याकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र तो आढळून आला नाही. 

येरवड्यातील काही मुले वानवडीतील उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्याबरोबर सोमनाथ मोरे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा देखील गेला होता. इतर मुले पोहत असताना सोमनाथ याने कालव्यात उडी मारली. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तो बुडायला लागला. हे लक्षात आल्यानंतर सोबत आलेल्या मुलांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. त्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी कालव्याच्या दिशेने धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काही अंतर पुढे गेल्यावर सोमनाथ दिसेनासा झाला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी संध्याकाळी उशिरापर्यंत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. अग्निशामक दलाचे अधिकारी बाळासाहेब कामठे यांनी ही माहिती दिली. 

आईचा आधार हरपला... 
सोमनाथ हा सारिका मोरे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आई धुणे-भांड्यांचे काम करून उदरनिर्वाह करत आहे. मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी आईने त्याला वसतिगृहात ठेवले होते. परंतु मामाने एकुलता एक भाचा वसतिगृहात नको; म्हणून त्याचे नाव येरवड्यातील शाळेत घातले होते. उन्हाळ्याची सुटी लागल्यावर पोहण्यास शिकण्यासाठी तो मित्रासोबत कालव्यावर गेला होता, त्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे सारिका यांचा एकुलता एक आधारही आता हरपला आहे. 

Web Title: Son drowned in the canal of Wanawadi