हार्ट अॅटॅक आलेल्या सासूला सूनबाईच्या हुशारीने जीवदान 

रमेश वत्रे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

सासूला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरून न जाता सुनेने टीव्हीवर कधी तरी पाहिल्याप्रमाणे "सीपीआर' (विशिष्ट पद्धतीने छाती दाबणे) केला. वेळीच झालेल्या या उपचारामुळे सासूचे प्राण वाचण्यास मदत झाली. देलवडी (ता. दौंड) येथील सुनेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

केडगाव (पुणे) : सासूला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरून न जाता सुनेने टीव्हीवर कधी तरी पाहिल्याप्रमाणे "सीपीआर' (विशिष्ट पद्धतीने छाती दाबणे) केला. वेळीच झालेल्या या उपचारामुळे सासूचे प्राण वाचण्यास मदत झाली. देलवडी (ता. दौंड) येथील सुनेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. 

देलवडी येथील रंजना उत्तम वाघोले (वय 65) यांना घरी असताना अचानक चक्कर व घाम आला आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्या वेळी घरातील इतर माणसे शेतावर होती. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकाराने सून शोभा जगदीश वाघोले या क्षणभर गोंधळून गेल्या. त्यांनी टीव्हीवर कधीतरी हृदयविकाराचा झटका आल्यावर छाती कशी दाबतात (सीपीआर) हे पाहिले होते. त्यानुसार त्यांनी तत्काळ रंजना यांची छाती दाबण्यास सुरवात केली. मात्र, पतीला फोन करावा; तर जवळ मोबाईल नव्हता. त्यामुळे मुलांकरवी शेजाऱ्यास तातडीने बोलावून पतीला फोन केला. दरम्यान, रंजना यांची लघवी व संडास झाली होती आणि जीभ बाहेर पडली होता. मात्र, शोभा यांनी सासूची ही अवस्था पाहून घाबरून न जाता छाती दाबणे चालूच ठेवले. 

दरम्यान, मुलगा जगदीश हा घरी आल्यानंतर त्याने आईला तातडीने मोटारीत घालून केडगाव (ता. दौंड) येथील डॉक्‍टर निखिल थोरात यांच्याकडे आणले. मात्र, तेथे त्यांना दुसरा झटका आला. थोरात यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने दौंड येथील "महालक्ष्मी हॉस्पिटल' येथे पाठवले. तेथे डॉक्‍टर डी. एस. लोणकर, डॉक्‍टर शलाका लोणकर व टीमने सीपीआर सुरू करून त्यांना व्हेंटिलेटरवर घेतले. तरीही रंजना प्रतिसाद देत नव्हत्या. हृदयाचे ठोके वीसपर्यंत आले होते. अशा अवस्थेत डॉक्‍टर त्यांना सीपीआर देतच राहिले. तसेच, तात्पुरता पेस मेकर बसवण्यात आला. डॉक्‍टरांनी अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर रंजना यांना धोक्‍याच्या स्थितीतून बाहेर काढले. सासूला जीवदान दिल्याने शोभा वाघोले यांचे कौतुक होत आहे. 

शोभा वाघोले यांनी सासूला वाचविण्यासाठी घरापासून दौंडपर्यंत (40 किलोमीटर) जी धडपड केली, त्याला आमचा सलाम आहे. सीपीआरची पद्धत व महत्त्व प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. 
- डॉ. शलाका लोणकर- कारंडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son-in-law rescues mother-in-law`s life in Pune district