3 हजारांसाठी मेंढपाळाला दिलेली सोनम पुन्हा ज्ञान मंदिरात

प्रियांका तुपे
रविवार, 24 जून 2018

पुणे - सोनम वाघ ही केवळ ११ वर्षांची. असंख्य स्वप्नं डोळ्यांत घेऊन शिकू पाहणारी..मात्र, शिक्षणाचा मूलभूत हक्‍क इतरांसारखा सहज मिळणं ही तिच्यासाठी मोठी अवघड गोष्ट. केवळ तीन हजार रुपये वर्षासाठी मिळावेत, यासाठी तिच्या वडिलांनी दोन वर्षांपूर्वी तिला एका मेंढपाळाच्या ताब्यात दिले. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे यांच्यामुळेच तिची या दुष्टचक्रातून सुटका झाली.

ओतूरमधील (ता. जुन्नर) कातकरी वस्तीत सोनम तिच्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या आईचा मृत्यू झाला असून, वडील आणि सावत्र आईने आणे या गावातील गणपा करंगळ या मेंढपाळाकडे वर्षभरासाठी तिला मेंढ्यांची राखण करायला पाठवले. त्यामुळे सोनमची शाळा कायमची सुटली. 

याबाबतची माहिती साबळे यांना कळल्यानंतर त्यांनी तिच्या वडिलांची व करंगळ यांचीही समजूत काढली. साबळे यांनीच पदरचे तीन हजार करंगळ यांना दिले व मुलीला वडिलांकडे देण्यास सांगितले.   

सोनमकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने आणि तिला नीट वाचता येत नसल्याने दोन शाळांनी तिला प्रवेश नाकारला; पण ओतूरमधील गाडगे महाराज शाळेचे मुख्याध्यापक राजू ठोकळ यांनी तिला प्रवेश देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे सोनम आता सोमवारपासून शाळेत जाणार आहे. 

मी पहाटेच उठून मेंढ्यांची राखण करायला जात होते. मालकांकडेच राहावे लागत होते. सकाळी लवकर उठले नाही तर मालक खूप मारायचे. माझी शाळा दोन वर्षे बुडाली. आता सोमवारपासून मी शाळेत जाणार आहे. मला खूप शिकायचं आहे.
- सोनम 

सोनमच्या वडिलांना खूप समजावलं. मेंढपाळही पैशांशिवाय मुलीला ताब्यात देत नव्हता. मी माझ्याकडचे पैसे त्याला दिले. आता मी पुढे तिच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे.
- अनिल साबळे, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: sonam wagh education in Junnar