शहरातील ‘आवाज’ वाढला

दीपेश सुराणा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पिंपरी - शहरातील ध्वनी प्रदूषणाचा आलेख चढता असल्याची माहिती महापालिका पर्यावरण अहवालाच्या (२०१७-१८) निष्कर्षातून समोर आली आहे. औद्योगिक, निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्राच्या ठिकाणी निश्‍चित मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी - शहरातील ध्वनी प्रदूषणाचा आलेख चढता असल्याची माहिती महापालिका पर्यावरण अहवालाच्या (२०१७-१८) निष्कर्षातून समोर आली आहे. औद्योगिक, निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्राच्या ठिकाणी निश्‍चित मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील ध्वनी पातळीचा वार्षिक अहवाल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात दिला आहे. शहरात क्षेत्रनिहाय विविध ठिकाणी दिवसा व रात्री ध्वनी पातळी तपासली गेली. मे, ऑगस्ट २०१७ आणि जानेवारी २०१८ या तीन महिन्यांत निवासी भागात ढोरेनगर (जुनी सांगवी), किवळे, निगडी-प्राधिकरण, तर व्यावसायिक पट्ट्यात पिंपरी बाजारपेठ, शिवाजी चौक (पिंपळे सौदागर), भारतमाता चौक (मोशी) येथे ध्वनी पातळी तपासली. औद्योगिक क्षेत्रात भोसरी एमआयडीसी आणि शांतता क्षेत्र म्हणून आदित्य बिर्ला रुग्णालय (थेरगाव), चैतन्य रुग्णालय (चिंचवड), जयहिंद हायस्कूल (पिंपरी) परिसराजवळ ध्वनी पातळी मोजली. रस्त्यावरील वाहने, वर्दळ आणि इतर घटकांमुळे दिवसा ध्वनी पातळी वाढल्याचे निरीक्षण आहे. चौक आणि रस्त्याच्या मध्यभागी परीक्षण केल्याने रात्रीच्या वेळीदेखील ध्वनी प्रदूषणाची पातळी जास्त आढळली आहे.
निवासी भागात दिवसा ६८.९ ते ९८.४ डेसिबल, रात्री ५९.१ ते ९७.३ डेसिबल, व्यावसायिक भागात दिवसा ७१.३ ते ९४.३ डेसिबल, रात्री ६३.५ ते ८४.३ डेसिबल व औद्योगिक भागात दिवसा ८१.२ ते ९१.७, रात्री ७७.३ ते ९१ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ७१.६ ते ८६.८, रात्री ६९.५ ते ८३.४ डेसिबल ध्वनी प्रदूषण आढळले आहे.

वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा नागरिकांनी वापर वाढवायला हवा. पर्यायाने, रस्त्यावर खासगी वाहनांचे प्रमाण कमी होईल. विविध सण-उत्सवांमध्ये वाजविण्यात येणारे फटाके आणि मिरवणुकांतील आवाजासाठी निश्‍चित केलेली मर्यादा पाळणे आवश्‍यक आहे.
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग 

वाहनांच्या हॉर्नचा आवाज, उत्सवांमध्ये मोठ्या आवाजात वाजविले जाणारे स्पीकर, मोबाईलचा अतिवापर यामुळे कानाच्या नसांवर थेट परिणाम होतो. हळूहळू उंच आवाज ऐकण्यास येण्याचे प्रमाण कमी होते. ऐकू कमी येणे, चिडचिडेपणा, उच्च रक्तदाब, एकाग्रता भंग पावणे, झोप कमी होणे; तसेच मानसिक वर्तनावर परिणाम जाणवतो.
- डॉ. सुधीर भालेराव

Web Title: Sound Pollution in Pimpri