मोबाईलवर बोलल्यास वाहन परवाना रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पुणे - वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याचे आढळून आल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर आता वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होत असून, अशा बेशिस्त चालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे - वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याचे आढळून आल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर आता वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होत असून, अशा बेशिस्त चालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहिमेचे आयोजन केले जात आहे. शहरात 23 एप्रिल ते दोन मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात सुमारे साडेसात हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 18 लाख रुपयांहून अधिक तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या आणि ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 15 दिवसांत शहरात मोबाईलवर बोलणाऱ्या दोन हजार 688 चालकांवर, तर ट्रिपल सीट असलेल्या 938 चालकांवर कारवाई करण्यात आली. 

यापुढील काळात मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईलच, याशिवाय वाहनचालकाचा परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी दिली. 

रस्ता सुरक्षा अभियानातील कारवाई 
नियमाचे उल्लंघन एकूण कारवाई तडजोड शुल्क (रुपयांत) 
जादा प्रवासी वाहतूक 128 37 हजार 400 रुपये 
अवैध प्रवासी वाहतूक 93 न्यायालयात खटले दाखल 
ड्रंक अँड ड्राइव्ह 69 न्यायालयात खटले दाखल 
मोबाईलवर बोलणे 2688 चार लाख 76 हजार 
सीट बेल्ट न बांधणे 1273 दोन लाख 36 हजार 
विनाहेल्मेट 1904 सात लाख 98 हजार 
रॅश ड्रायव्हिंग 84 70 हजार 400 
ट्रिपल सीट 938 एक लाख 78 हजार 

मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांमुळे गंभीर अपघात होत आहेत. अशा वाहनचालकामुळे त्याच्यासह इतरांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहचालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कानात एअरफोन आणि ब्ल्यू टूथ असलेल्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक 

Web Title: Speaking on mobile the vehicle license can be canceled