गर्भवतींसाठी विशेष रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - गर्भवतींची हेळसांड रोखण्यासाठी महापालिकेने उपाय आखण्यास सुरवात केली आहे. प्रसूतीसाठी महिलांना लगेचच रुग्णालयात पोचता येईल, या उद्देशाने खास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन फिरत्या रुग्णवाहिका रस्त्यावर येतील, यामध्ये प्रसूतितज्ज्ञासह गर्भवतींना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या असतील. 

महापालिकेच्या रुग्णालयामध्ये गर्भवतींची हेळसांड होत असल्याकडे ‘सकाळ’ने ‘तिच्या कळा’ या वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधले होते. दुर्बल घटकातील महिलांना या सुविधेचा फायदा होणार असून, ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. त्याकरिता स्वतंत्र संपर्क यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन रुग्णवाहिकांना महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. साधारणतः दीड महिन्यात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्थायी समिती आणि आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या रुग्णवाहिकांची संख्या नंतर वाढविण्यात येणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधील सेवा-सुविधा विस्तारण्यात येत असल्या, तरी गर्भवतींसाठी त्या प्रमाणात सुविधा नाहीत.

त्यातच, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात शुभांगी जानकर या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. उपचारासाठी नेण्याकरिता वाहन न मिळाल्याचे कारणही त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते. या पार्श्‍वभूमीवर गर्भवतींसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले आणि वृषाली चौधरी यांनी मांडला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.

महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची सुविधा आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येईल, त्याकरिता पुरेसा निधी देण्यात येईल. 
- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती

प्रसूतीआधी महिलांना वेळेत रुग्णालयात जाता यावे, यासाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येत आहेत. मागणीनुसार ती उपलब्ध होईल.
- राजश्री नवले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती

Web Title: Special Ambulance for Pregnant women