'इंद्रायणी'साठी विशेष आराखडा बनविणार - आमदार लांडगे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहमती दर्शविल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहमती दर्शविल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी भागांतील नाले आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. मैलामिश्रित सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.

यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आणि नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यासाठी शनिवारी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांच्यासह आयुक्त हर्डीकर यांनी इंद्रायणी नदीपात्राची आळंदीपर्यंत पाहणी केली. त्या वेळी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.

मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणार
महापालिका हद्दीतील सांडपाणी, मैलामिश्रित पाणी व विविध कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मैलामिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते, अशा ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मैला शुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याबाबत महापालिका स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

'सीएसआर'मधून नदी संवर्धन
इंद्रायणी नदीच्या दुतर्फा पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चाकण हद्दीतील औद्योगिक कंपन्या आहेत. कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करावा लागतो. या कंपन्यांना आपला "सीएसआर' निधी नदीच्या संवर्धनासाठी खर्ची करण्याबाबत बंधनकारक करण्यात यावे. त्याद्वारे नदी विकास निधी उभा करून नदी संवर्धनाचे काम करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली. याबाबत कायदेशीर बाबी तपासून सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. सीएसआरच्या माध्यमातून देहू ते आळंदी भागातील नदी सुधार प्रकल्प निर्माण करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल, असे आयुक्त म्हटल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.

Web Title: special diagram for indrayani river