महापालिकेत समाविष्ट 11 गावांसाठी विशेष निधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या प्रकल्पाग्रस्तांचा प्रश्‍न सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या प्रकल्पाग्रस्तांचा प्रश्‍न सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांच्या मदतीने पाठपुरावा करणार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""सुरक्षिततेसाठी पुण्यात सुमारे 4 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यातील सुमारे 1450 कॅमेरे बसवून झाले आहेत. उर्वरित कॅमेऱ्यांसाठी पाठपुरावा करणार आहे. रिंग रोडचे भूसंपादन वेगाने मार्गी लागण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबतही उपाययोजना सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न असल्यामुळे पाण्याचा पुर्नवापर करण्यास प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्यातंर्गत "जायका' प्रकल्पाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून दक्ष राहून तपास करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.'' 

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. तसेच शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी रस्त्यांचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शक्‍य तेवढ्या सर्व उपाययोजना केल्या जातील. शहरातील पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत (डिसी रूल) काही सुधारणा केल्या आहेत. नव्या बांधकामांच्यावेळी त्यांची अंमलबजावणी होईल. पुण्यातही पे अँड पार्क योजनेचा वापर महापालिकेने नफा कमविण्यासाठी करू नये तर, प्रश्‍न सुटण्यासाठी करावा, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पावसाळ्यातही मेट्रोचे काम 
पावसाळा सुरू झाला म्हणून नदीपात्रातील मेट्रो मार्गाचे काम बंद करण्याचे सूतोवाच महामेट्रो करीत आहे. परंतु, पुण्याच्या परिसरातील धरणे भरल्यानंतर नदीत पाणी सोडण्यास सुरवात होईल, तेव्हा काम बंद केले पाहिजे. या दोन महिन्यांत मेट्रोचे किमान 30-35 खांब उभे राहू शकतात. तसेच जलसंपदा विभागानेही काम बंद करण्याचे पत्र महामेट्रोला दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यातही नदीपात्रात मेट्रोचे काम सुरू ठेवण्याची सूचना केली आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

Web Title: Special fund for 11 villages in municipal corporation