बोलींमधून जपली जातेय माय मराठी

बोलींमधून जपली जातेय माय मराठी

महाराष्ट्रात राहणारा तो मराठी माणूस. त्याची मातृभाषा मराठी. परंतु त्याची बोली त्याचे जन्मस्थान अथवा कर्मस्थानावरून ठरते. कोणत्याही बोलीची लकब ही विशेष ओळख असते. प्रवीण माळी यांचं ‘आयतं पोयतं सख्यानं’ हे नाट्य ऐकताना जाणवतं. खानदेशातील विविध बोलींमधील शब्दांची लकब, त्यांची शब्द उच्चारण्याची लय, त्यातील विविधता दिसून येते. अशीच विविधता महाराष्ट्रात अन्य बोलींमधूनही दिसून येते. 

माझी माय सरसोती,
माले शिकवते बोली 
लेक बहिनाच्या मनी 
किती गुपित पेरली...

खरंच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ही बोलीबाबतची समर्पक रचना. त्यात अहिराणी, तावडी, लेवापाटीदारी बोलीतील शब्द आढळत असले तरी, अन्य बोलींबाबतही त्यांचं मत वास्तव मांडणारे आहे. कारण महाराष्ट्रात राहणारा तो मराठी माणूस आणि त्याची मातृभाषा मराठी. परंतु त्यांची बोली त्यांच्या जन्मस्थान अथवा कर्मस्थानावरून ठरत असते. एकट्या पिंपरी-चिंचवडचा अभ्यास केल्यास वेगवेगळ्या भागांची अनुभूती येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून कामधंदा, नोकरीनिमित्त आलेला माणूस येथे वास्तव्यास आहे. त्यांच्याशी बोलताना त्या त्या भागातील बोली ऐकायला मिळते. त्यातील लय, लकब दिसते. व्यक्तीच्या बोलण्यावरून तो कोणत्या भागातील आहे, याची माहिती न विचारताही ऐकणाऱ्या व्यक्तीला होत असते, इतका प्रभाव बोलीचा दिसून येतो. 

उदाहरण पाहिल्यास, मराठी ‘डोक’ शब्दाचा उच्चार तावडी बोलीत ‘डोखं’ असा होता. ‘राहिले’ या मराठी शब्दाचा उच्चार वऱ्हाडीत ‘राह्यले’ असा होता. ‘चाललास का’ या शब्दाचा मराठवाडीतील उल्लेख ‘चाल्लास का’ असा होतो. तावडी बोली जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव तालुक्‍याचा काही भाग येथे बोलली जाते. मराठवाडी बोली मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात बोलली जाते. वऱ्हाडी बोली बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद तालुक्‍यांसह अकोला, वाशिम, वर्धा, अमरावती आदी भागात बोलली जाते.

या भागातील माणसांसह मालवणी (सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा दक्षिण भाग), झाडीबोली (भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली), नागपुरी (नागपूर जिल्हा व परिसर), अहिराणी (जळगावचा पश्‍चिम भाग, धुळे, नंदुरबार (नंदुरबारी अहिराणी), नाशिकमधील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे पट्टा) इत्यादी तालुके), आगरी (रायगड आणि ठाणे), चंदगडी (कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भाग व चंदगड तालुका), कोल्हापुरी (कोल्हापूर) आदी बोली ऐकायला मिळतात. त्यामुळे मराठी मातृभाषा असलेल्यांची बोली मात्र भिन्न भिन्न असल्याचे आढळते आणि प्रत्येकाला आपल्या बोलीचा अभिमान हा असायलाच हवा. त्यामुळेच अनेकदा जाणवते, की ‘जळगाव’चा उल्लेख तावडी पट्ट्यातील नागरिकांच्या तोंडी ‘जडगाव’ किंवा ‘जयगाव’ असा होताना दिसतो. म्हणजेच काही ठिकाणी ‘ळ’चा ‘ड’ तर काही ठिकाणी ‘ळ’चा ‘य’ होतो. म्हणजेच हा बोलींचा प्रभाव आहे. त्यामुळेच कदाचित बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आजही तावडी किंवा अहिराणी किंवा लेवापाटीदार बोली नसलेल्यांच्या सुद्धा ओठांवर रुंजी घालत असाव्यात. म्हणूनच ‘माझी माय सरसोती, माले  शिकवते बोली...’, हे बहिणाबाईंचे उद्‌गार प्रत्येक 
बोलीसाठी सार्थ ठरतात आणि बोलीचा 
महिमा गातात माय मराठीच्या समृद्धीसाठी, संवर्धनासाठी.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com