प्रचाराच्या नियोजनाला वेग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पुणे - उमेदवारी मिळाल्यानंतर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार वेगाने कामाला लागले आहेत. प्रभाग मोठा आणि हातात कमी
वेळ असल्यामुळे यासाठीचे नियोजन उमेदवार आणि त्यांच्या खास कार्यकर्त्यांकडून सुरू केले आहे.

पुणे - उमेदवारी मिळाल्यानंतर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार वेगाने कामाला लागले आहेत. प्रभाग मोठा आणि हातात कमी
वेळ असल्यामुळे यासाठीचे नियोजन उमेदवार आणि त्यांच्या खास कार्यकर्त्यांकडून सुरू केले आहे.

छाननीत अर्ज वैध ठरल्याने आता प्रचाराच्या कामाला वेग आला आहे. अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत राजकीय गणित बसविण्याचा अभ्यासही सुरू झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला कोणाची उमेदवारी अडचणीची ठरू शकते, तसेच आपल्यासाठी घातक असलेल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावण्यासाठी प्रयत्न, याचेही डावपेच सुरू झाले आहेत. त्याच वेळी प्रभागात प्रभावी प्रचार कसा करता येईल याचे "प्लॅनिंग' ठरू लागले आहे.

सोसायटी, झोपडपट्टी-वस्ती भागात बैठकांचे आयोजन, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे नियोजन, पदयात्रा, वाहन फेरी, कोपरा सभा याचे वेळापत्रक तयार केले जात आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांची वेळ मिळविण्याचे प्रयत्न केले जात असून, शहर पातळीवरील नेतृत्वाकडे त्याविषयी विचारपूस होत आहे. या सर्व गोष्टींशी संबंधित माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे, त्याच्या परवानग्या काढणे याची जबाबदारी ठराविक कार्यकर्त्यांकडे सोपविली जात आहे. हिशेब ठेवण्याची जबाबदारी काहींनी दिली आहे तर काही जणांचे त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

प्रभाग मोठा असल्याने अधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी "सोशल मीडिया'चा प्रभावीपणे वापर केला जात आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे "व्हॉट्‌सऍप ग्रुप' बनवून कामाचे नियोजन आणि त्या संबंधीचे निरोप पोचते केले जात आहेत. "सोशल मीडिया' काळजीपूर्वक हाताळण्यासाठी काही उमेदवारांनी "खास' कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे.

अनेक उमेदवारांनी आपल्या भागातील नागरिकांचे संपर्क क्रमांक पूर्वीच गोळा करून ठेवले आहेत. त्यांना त्याचा फायदा होत आहे. संबंधित भागात आयोजित प्रचारफेरी, पदयात्रा, वाहन फेरी, प्रचार सभा याची माहिती त्या नागरिकांपर्यंत पोचविणे सोपे झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच बहुतेक उमेदवारांचे प्रचार पत्रक नागरिकांपर्यंत पोचले आहे. प्रभागात चार उमेदवार एकत्रित की स्वतंत्र प्रचार करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यासाठी चारही उमेदवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्राथमिक बैठका कालपासून सुरू झाल्या आहेत. जेथे "पॅनेल'मधील उमेदवारांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत तेथे ते एकत्रित प्रचार करतील यात शंका नाही. जेथे संबंध चांगले नाहीत तेथे मात्र एकाच पक्षाचे उमेदवार वेगवेगळा प्रचार करताना दिसले तर नवल नाही.

Web Title: speed for management of election campaign