
आयुष मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ई-मेलद्वारे सादर केल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे.
खासदार डॉ.कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका प्रकल्पाला गती
जुन्नर - जुन्नर तालुक्यात राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था स्थापनेचा प्रस्ताव आज ता. १९ रोजी आयुष मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ई-मेलद्वारे सादर केल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे.
जुन्नर, आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात विशेष करून भीमाशंकर अभयारण्यात विविध प्रकारच्या वनौषधी मोठ्या प्रमाणात आढळतात. आयुर्वेदात या वनौषधींना महत्वाचे स्थान आहे. डॉ. कोल्हे यांनी या वनौषधींचे संशोधन, संवर्धन व लागवड तसेच, त्यावर प्रक्रिया करणेसाठी शास्त्रोक्त पद्धतीने काम करणारी राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था असावी अशी संकल्पना मांडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन निधीतून संस्थेचा डीपीआर तयार करण्यासाठी निधी मंजूर केला होता. या संस्थेच्या निर्मितीसाठी पुणे विद्यापीठामार्फत प्रयत्न झाल्यास संस्थेला उच्च दर्जा प्राप्त होईल या विचारातून डॉ. कोल्हे यांनी ३१ जुलै २०२१ रोजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांची भेट घेतली. असता त्यांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत प्रकल्पासाठी डॉ. दिगंबर मोकाट यांची समन्वयक आणि डॉ. डी. जी. नाईक, डॉ. गिरीश टिल्लू व प्रा. अविनाश आडे यांची समिती स्थापन केली होती.
कुलगुरू डॉ. करमाळकर व डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्थेचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला १२ मार्च रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या बैठकीला कुलगुरू डॉ. करमाळकर आणि खासदार डॉ.कोल्हे उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयानुसार जुन्नर तालुक्यात राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव सचिव, केंद्रीय आयुष मंत्रालय यांना ईमेलद्वारे सादर केला.
या प्रस्तावानुसार राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रायबल मेडिसिन अभ्यासक्रमाची रचना करणार असून आदिवासी वैद्यक क्षेत्रात प्रमाणपत्र कार्यक्रम, डिप्लोमा, पदवी आणि पीएचडी यांसारख्या विविध स्तरांवर अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था, इंद्रायणी मेडिसिटीसारखे प्रकल्प शिरुर मतदारसंघात आणण्याचे माझे प्रयत्न आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तर होईलच. शिवाय आदिवासी उद्योजक बनण्यासाठी मोठी संधी निर्माण होईल.
- खासदार डॉ. अमोल कोल्हे.