स्पाइन रस्त्याला ३०० मीटरचा ‘खोडा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पिंपरी - पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. मात्र, महापालिका आणि प्राधिकरण यांच्या त्रिवेणीनगर येथील डीपी प्लॅनमध्ये फरक आहे. त्यामुळे काही नागरिकांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील केवळ तीनशे मीटरचा रस्ता सुमारे पंधरा वर्षांपासून रखडला असून, स्पाइन रस्त्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरत आहे. 

पिंपरी - पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. मात्र, महापालिका आणि प्राधिकरण यांच्या त्रिवेणीनगर येथील डीपी प्लॅनमध्ये फरक आहे. त्यामुळे काही नागरिकांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील केवळ तीनशे मीटरचा रस्ता सुमारे पंधरा वर्षांपासून रखडला असून, स्पाइन रस्त्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरत आहे. 

औद्योगिक, व्यापारी आणि निवासी क्षेत्रांसाठी दळणवळण सोयीचे व्हावे, यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रोडची आखणी केली होती. पुणे-नाशिक, पुणे-मुंबई आणि मुंबई-बंगळरू (देहूरोड-कात्रज बाह्यवळण) महामार्ग जोडण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यासाठी प्राधिकरण व महापालिका यांनी १९८६-९६ असा संयुक्त डीपी प्लॅन तयार केला होता. त्यानुसार ७५ मीटर स्पाइन रस्ता विकसित करण्याचे नियोजन होते. प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीतील रस्त्याची उभारणी पूर्ण केली आहे. त्याचे काम दहा वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, त्रिवेणीनगर येथे सुमारे तीनशे मीटरचा रस्ता रखडला आहे. हा भाग महापालिकेच्या हद्दीत येत आहे. या ठिकाणी महापालिकेच्या डीपी प्लॅननुसार स्पाइन रस्ता प्राधिकरणाच्या १९८६च्या डीपीपेक्षा सुमारे ३० मीटरने दक्षिणेकडे दर्शविलेला आहे. त्यानुसार सुमारे ४० मिळकतधारक जास्त बाधित होत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी हरकत घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त डीपीनुसार किंवा उपलब्ध जागेतच रस्ता करावा. मात्र, महापालिका स्वतःच्या डीपीवर ठाम राहिल्यामुळे रस्ता रखडला आहे. 

त्रिवेणीनगर येथील तीनशे मीटर रस्ता पूर्ण झाल्यास वाहनचालकांना थेट जाणे सोयीचे होणार आहे. सध्या वाहनचालकांना कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक, यमुनानगर या रस्त्यांचा किंवा कृष्णानगरमधील छोट्या गल्लीचा वापर करावा लागतो. स्पाइन रस्ता पूर्ण झाल्यास वाल्हेकरवाडीमार्गे औंध-रावेत बीआरटी रोड व बाह्यवळण मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हाच रोड एचसीएमटीआर (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) म्हणून ओळखला जात आहे. 

नागरिक म्हणतात...
प्राधिकरणाच्या डीपीनुसार बाधित मिळकती ९२ असून, एकूण क्षेत्र २८० गुंठे आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार बाधित मिळकती १२८ असून, एकूण क्षेत्र ३६० गुंठे आहे. त्यामुळे जवळपास ३६ मिळकती आणि ८० गुंठे जागा जास्त बाधित होत आहेत. 

महापालिकेच्या मते...
प्राधिकरणाच्या डीपीनुसार बाधित मिळकती ९२ असून, एकूण क्षेत्र २८० गुंठे आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार बाधित मिळकती सुमारे ७६ आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या डीपीनुसार जवळपास १६ मिळकती जास्त बाधित होत आहेत. त्यामुळे महापालिकेचा डीपी योग्य आहे.

सेक्‍टर ११ मध्ये स्थलांतर
स्पाइन रस्त्यामुळे त्रिवेणीनगर येथे बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना प्राधिकरणातील सेक्‍टर ११ मध्ये पर्यायी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी १.४५ हेक्‍टरचा भूखंड राखीव आहे. प्रत्येक मिळकतधारकास १२५० चौरस फुटांचा भूखंड दिला जाणार आहे. त्यापोटी महापालिकेने १६ कोटी ६५ लाख रुपये प्राधिकरणाला दिले आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सेक्‍टर ११ मधील भूखंड प्राधिकरणाच्या डीपीमुळे बाधित होणाऱ्या ९२ मिळकतधारकांसाठी पुरेसा आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार जादाचे सुमारे ३६ मिळकतधारक बाधित होत असल्यामुळे आणखी ७५ गुंठ्यांची आवश्‍यकता आहे. तशी मागणीही महापालिकेने प्राधिकरणाकडे केली आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीनुसार रस्ता झाल्यास त्याला दोन ठिकाणी वळणे येणार असून, वाहतुकीस तो धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे प्राधिकरणाच्या डीपीनुसारच स्पाइन रस्ता झाला पाहिजे. 

असा आहे स्पाइन रस्ता
एकूण लांबी    ९.१ किलोमीटर
रस्त्याची रुंदी    ७५ मीटर
एमसीएमटीआर रुंदी    ३० मीटर 
दोन्ही बाजूचा रस्ता    २२.५ मीटर

Web Title: spine road work stop