रस्त्यावर थुंकल्यास होणार दंड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीनंतर महापालिकेने आता शहरातील रस्त्यांवर घाण करणे, कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त केले असून, गेल्या आठ दिवसांत चाळीस जणांकडून १८ हजार ६१० रुपये दंड वसूल केला आहे. यात रस्त्यावर थुंकणाऱ्या १७ जणांचा समावेश आहे. 

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीनंतर महापालिकेने आता शहरातील रस्त्यांवर घाण करणे, कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त केले असून, गेल्या आठ दिवसांत चाळीस जणांकडून १८ हजार ६१० रुपये दंड वसूल केला आहे. यात रस्त्यावर थुंकणाऱ्या १७ जणांचा समावेश आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने प्लॅस्टिक व घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त केली आहेत. प्लॅस्टिक व थर्मोकॉलचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच, नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे आणि दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणे सक्तीचे केले आहे. आता रस्त्यांवर घाण करणे, कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 

महापालिकेची कारवाई
रस्त्यावर घाण टाकणाऱ्या नऊ व्यक्तींकडून महापालिकेने ११ हजार ४६० रुपये दंड वसूल केला आहे. यात तळवडे-निघोजे रस्त्यावर इंद्रायणी नदी पुलाजवळ टेक्‍सटाइल व्यवसायातील कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्याचाही समावेश आहे. सागर भाटिया या व्यापाऱ्यावर कारवाई करून सोमवारी (ता. १९) १० हजार रुपये दंड वसूल केला. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ व्यक्तींकडून दोन हजार ८५० रुपये, उघड्यावर लघुशंका करणाऱ्या नऊ व्यक्तींकडून एक हजार ८०० रुपये आणि उघड्यावर शौच करणाऱ्या पाच जणांकडून अडीच हजार रुपये दंड वसूल केला आहे.  

केंद्र सरकारच्या आदेशानुसार व घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार शहरात घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

दंडाची रक्कम
 कृती    दंड (रुपयांत)
 रस्त्यावर घाण करणे    १८०
 सार्वजनिक ठिकाणी थुंकणे    १५०
 उघड्यावर लघुशंका करणे    २००
 उघड्यावर शौच करणे     ५००

Web Title: Spitting on the road will be a penalty