मधुवंतीचं माधुर्य अन्‌ बसंतचा तजेला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मधुवंतीचं माधुर्य... मारवा, बसंतचा तजेला आणि उत्तरार्धात रंगलेला सूफियाना... वसंतोत्सवाच्या दिमाखाची पताका डौलात उंचावणाऱ्या सादरीकरणाने या संगीत महोत्सवाचा आज समारोप झाला.

पुणे - मधुवंतीचं माधुर्य... मारवा, बसंतचा तजेला आणि उत्तरार्धात रंगलेला सूफियाना... वसंतोत्सवाच्या दिमाखाची पताका डौलात उंचावणाऱ्या सादरीकरणाने या संगीत महोत्सवाचा आज समारोप झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सकाळ’ने आयोजिलेल्या वसंतोत्सवाचे ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे मुख्य प्रायोजक होते. पॉवर्ड बाय रावेतकर ग्रुप, तर सहप्रायोजक चार्वी सारीज्‌ व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. होते. ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज्‌, फूड पार्टनर मेहफिल केटरिंग सर्व्हिसेस व कम्युनिकेशन पार्टनर सेतू ॲडव्हर्टायझिंग होते. व्यवस्थापन व्हाइट कॉपर एंटरटेन्मेंट यांनी  केले.
डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी पहिल्या सत्राची सुरुवात मधुवंती रागातील ‘बैरन बरखा रितू आयी’ या बंदिशीने केली. नंतर ‘मैं आऊँ तोरे मंदिरवा’ ही कुमारगंधर्व यांची बंदिश सादर करताना नादमाधुर्याचा आनंद रसिकांना दिला. वसंतराव आणि कुमार गंधर्व यांच्यातील मैत्री व त्यांच्या पत्रव्यवहाराचे किस्से सांगत दोघांची आठवणही  जागवली.

कुमारगंधर्वांच्या राही रागात ‘आजा रे कंथा’ ही रचनाही सादर केली. ‘उड जाएगा हंस अकेला...’ या रचनेने त्यांनी समारोप केला. त्यांना तबल्यावर निखिल फाटक आणि संवादिनीवर चैतन्य कुंटे यांनी साथसंगत केली.

उल्हास कशाळकर यांच्या कसदार गायकीने या महोत्सवात बहार आणली. सुरुवातीला मारव्यातील ‘चैन ननदिया चबावे’, ‘गुनीजन गावो’, ‘बजावोसा बंदिशीं’ना त्यांनी जोरकस आलाप, तानांमधून फुलवत नेले. वसंतरावांची आठवण करीत बसंत रागातील दोन बंदिशीतून मैफलीला तजेलदार बनविले. तबलावादक पं. विजय घाटे आणि संवादिनीवादक श्रीराम साथीने ‘रे पट बिजन’ आणि ‘द्रुम द्रुम लता लात’ या बंदिशींना, तसेच तराण्याला तालाशी खेळवत शैलीदार गायकीची अनुभूती रसिकांना दिली. खमाज रागातील ‘कोयलिया कुक सुनाये’ आणि तराणा पेश करीत गायनाचा समारोप केला.

सूफी संगीतातील आघाडीचे नाव असलेल्या ऋचा शर्मा यांनी रात्री सव्वाआठच्या सुमारास मंचाचा ताबा घेतला. पुढील दीडतास त्यांचा ‘सूफियाना’ स्वर रसिकांभोवती रुंजी घालत राहिला. ‘जिंदगी में कोई कभी आए ना रब्बा’, ‘माही वे’, ‘तेरा सजदा’, ‘तेरे बिन नहीं लगना...’ या गीतांमधून रसिकांना डोलवले, नाचविले आणि गायलाही लावले. त्यांचा तीनही सप्तकांत लीलया फिरणाऱ्या स्वरांना रसिकांनी डोक्‍यावर घेतले. प्रत्येक गाण्याला टाळ्यांच्या कडकडाटाने दाद मिळत राहिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

जुगलबंदीचा आनंद
‘तेरे बिन नहीं लगना, दिल है छोटी सी आशा...’ या गाण्यांमध्ये राहुल यांचाही स्वर मिसळला आणि काही क्षण ऋचा यांच्याबरोबर जुगलबंदीचा आनंद त्यांनी दिला. रसिकांशी संवाद साधत त्यांची फर्माईशही ऋचा यांनी पूर्ण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous response of Punekar for vasantostav