सचिन सरांनी घेतला स्पोर्टसचा तास!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - 'मुलांना खेळण्यासाठी मैदाने ही हवीच, त्यामुळे मैदानांकडे "वारसा' म्हणून पाहा, महाविद्यालय आणि शाळांतील खेळाडूंसाठी ग्रेडेड टक्केवारी असावी तसेच शालेय अभ्यासक्रमात क्रीडा विषय अनिवार्य असला पाहिजे,''अशी स्पष्ट मते मांडत "भारतरत्न' मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज जोरदार बॅटिंग केली. सचिनच्या चौफर बॅटिंगने प्रशासन, प्राचार्य, शिक्षक-पालक साऱ्यांनाच अप्रत्यक्षरीत्या झोडपले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या "मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया' मोहिमेचे उद्‌घाटन सचिनच्या हस्ते सोमवारी झाले. या निमित्ताने सचिनने सभागृहातील उपस्थित प्राचार्य, अभिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्राध्यापक यांचा जणू तासच घेतला. यात सचिन सरांनी फिटनेससाठी खेळाचे महत्त्व सांगत क्रीडा संस्काराचे धडे दिले.

'कोणताही खेळ प्रकार असू देत, आयुष्यात खूप काही शिकवून जातो,'' असे सांगत सचिनने अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्त्व देण्याचा सल्ला दिला. "फिटनेस'चा गांभीर्याने विचार व्हावा, अशी आग्रही भूमिका मांडताना तो म्हणाला, 'भारत 2020 पर्यंत जगातील सर्वाधिक तरुण देश असेल; पण लठ्ठपणा असलेल्या नागरिकांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशाने 2012-13 मध्ये जवळपास सहा लाख कोटी रुपये आरोग्याविषयक समस्यांवर खर्च केले. आरोग्याविषयक समस्या कमी करण्यासाठी "फिटनेस'चे महत्त्व लक्षात घ्या.''

'समोरचा काहीतरी बोलतोय आणि तुम्ही मोबाईलवर काहीतरी करताय, हे चित्र सर्रास पाहायला मिळते. कधी-कधी वाटत हे नव्हतं तेव्हा बरं होतं'', असे सांगत सचिनने मोबाईलचे व्यसन जडलेल्या तरुणांचे प्रत्यक्ष संवादाकडे लक्ष वेधले.

या वेळी सचिनसह उपस्थितांनी पुढच्या पिढीत क्रीडा संस्कार रुजविण्याची प्रतिज्ञा घेतली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. जयंत उमराणीकर, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डॉ. दीपक माने या वेळी उपस्थित होते. क्रीडा समीक्षक सुनदंन लेले यांनी सचिनची मुलाखत घेतली. डॉ. मीनल सोहनी यांचे मानसिक आरोग्याविषयक सादरीकरण झाले.

सचिनने दिलेला कानमंत्र :
- आयुष्यात "शॉर्ट कट' शोधण्याचा प्रयत्न करू नये
- निवृत्त खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून विचार व्हावा
- शाळा, कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्तरावर खेळाडूंना "ग्रेडिंग' हवे
- शालेय अभ्यासक्रमात "क्रीडा' विषय सरकारने अनिवार्य करावा

Web Title: sports news sachin tendulkar sports class teaching