धक्कादायक! पिंपरीत दर महिन्याला नवविवाहितेची आत्महत्या

मंगेश पांडे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पिंपरी शहरात नवविवाहितेचा छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातून विवाहिता टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग स्वीकारून जीवनयात्रा संपवत आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्‍टोबर या कालावधीत अकरा घटनांची नोंद झाली आहे. 

पिंपरी (पुणे) : शहरात नवविवाहितेचा छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातून विवाहिता टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग स्वीकारून जीवनयात्रा संपवत आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्‍टोबर या कालावधीत अकरा घटनांची नोंद झाली आहे. 

हुंडा दिला नाही, माहेराहून पैसे आणावेत, स्वयंपाक येत नाही, संशय घेणे, वागणूक व्यवस्थित नाही, अशा कारणांवरून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत विवाहिता अनेकदा माहेरी सांगत नाही. मात्र, परिसीमा झाल्यावर त्या आत्महत्या करतात. आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या पंधरा ठाण्यांच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्‍टोबर अशा 11 महिन्यांत 11 नवविवाहितांनी आत्महत्या केली. हे प्रमाण सरासरी महिन्याला एक आहे. 

ऑगस्ट 2018 मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. यानंतर महिलांच्या समस्यांचे, तक्रारींचे निवारण करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये महिला सहायक कक्ष स्थापन करण्यात आला. येथे विविध कारणांवरून विवाहितेचा छळ होत असल्याबाबतच्या तक्रारी दाखल होत आहेत. यामध्ये सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाबाबतच्या अधिक तक्रारी आहेत. किरकोळ कारणांवरूनही विवाहितेचा छळ होत असल्याचे दिसून येते. लग्नात मानपान दिला नाही, स्वयंपाक येत नाही, साडीच नेसावी, यावरूनही छळ होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

लग्नानंतर काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. सुरुवातीला नोकरी करण्यावरून त्रास दिला. त्यानंतर पतीचे घराबाहेर थांबणे वाढले. माझ्या माहेरच्या लोकांना दोष देत वारंवार मानसिक त्रासही दिला. लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. पतीविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता. मात्र, छळ थांबत नसल्याने गुन्हा दाखल करावा लागला, अशी व्यथा डुडुळगाव येथील एका पीडित महिलेने मांडली. 

मन मोकळे करा... 
पती-पत्नीने एकमेकांना समजून घेत मित्र म्हणून राहायला हवे. महिलेला सासरच्या मंडळींकडून अथवा इतर कोणाकडून त्रास होत असल्यास याबाबत जवळच्या व्यक्तींकडे मन मोकळे करणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक महिला स्वत:च्या त्रासाबाबत, समस्यांबाबत इतरांकडे व्यक्त होत नाहीत. सर्व गोष्टी मनात साठवून ठेवतात आणि काही कालावधीनंतर सहनशीलता संपल्यावर आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. पीडित महिलेने कोणाला तरी आपल्या समस्यांबाबत बोलणे आवश्‍यक आहे. प्रत्येक समस्येतून मार्ग निघतो. 
वंदना मांढरे, समुपदेशक 
--------------------- 

आत्महत्यांच्या घटना 
जानेवारी ते ऑक्‍टोबर ः 11 
-------------------------- 
महिला सहायक कक्षाकडील अर्जांची स्थिती 
(नोव्हेंबर 2018 ते ऑक्‍टोबर 2019) 
तडजोड ः 79 
न्यायालयात गेलेली प्रकरणे ः 72 
पोलिस ठाण्याकडे पाठविलेली प्रकरणे ः84 
प्रलंबित ः71 
एकूण ः306 
--------------------------- 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spouse's suicide every month in Pimpri chinchwad city