द्राक्षावरील औषध फवारणीचे 35 कोटी पाण्यात 

रवींद्र पाटे
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सततचा पाऊस व ढगाळ हवामान, अशा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी मागील एक महिन्यात केवळ औषध फवारणीसाठी जुन्नर तालुक्‍यातील उत्पादकांचा सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, वीस दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे फवारणीचा खर्च वाया गेला आहे. 

नारायणगाव (पुणे) : सततचा पाऊस व ढगाळ हवामान, अशा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी मागील एक महिन्यात केवळ औषध फवारणीसाठी जुन्नर तालुक्‍यातील उत्पादकांचा सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, वीस दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे फवारणीचा खर्च वाया गेला आहे.

डावणी, करपा रोगामुळे वेलीवरील घड जिरले असून, बहुतेक शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाणार असल्याने द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. पुढील वर्षभर द्राक्ष बागा जगवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना एकरी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सतीश पाटे व उपाध्यक्ष अवधूत बारवे यांनी केली आहे. 

जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी मागील पन्नास वर्षापासून द्राक्ष उत्पादन घेत आहेत. जंबो द्राक्षाच्या निर्यातीबाबत तालुका अग्रेसर आहे. तालुक्‍यात सुमारे चार हजार एकर क्षेत्रात विविध जातीच्या द्राक्ष बागा आहेत. दरवर्षी द्राक्षाच्या खरेदी विक्रीतून तालुक्‍यात सुमारे चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे मागील तीन वर्षापासून द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षी द्राक्ष उत्पादकांनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा काढला होता. नारायणगाव परिसरातील 444 द्राक्ष उत्पादकांनी पीक विम्यापोटी 34 लाख 64 हजार 569 रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे भरली होती.

मागील वर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पंचनामे झाले, मात्र पीक विमा कंपनीने अद्याप एक रुपयाचीसुद्धा नुकसान भरपाई दिली नाही. या वर्षी सरकारने अद्याप पीक विम्याची अमंलबजाबणी केली नाही. ऑक्‍टोबर छाटणीनंतर मागील एक महिना सतत पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण आहे. अशी स्थिती मागील पन्नास वर्षात प्रथमच निर्माण झाली आहे.

द्रा क्ष बागा वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सकाळी व सायंकाळी अशी दोन वेळा द्राक्ष उत्पादक मागील महिनाभरापासून बुरशी नाशकांची फवारणी करत आहेत. महिनाभरात बागांवर पन्नास ते साठ फवारण्या झाल्या आहेत. निव्वळ फवारणीसाठी आजअखेर एकरी एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. तालुक्‍यात सुमारे चार हजार एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. या क्षेत्रात फवारणीसाठी महिनाभरात सुमारे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

फवारणी करूनही सततच्या पावसामुळे द्राक्ष बागा वाचविण्यात अपयश आल्याने द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. द्राक्ष पीक वार्षिक असून, वेलीच्या संगोपनासाठी एकरी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. या वर्षी हंगाम वाया गेला असून, मशागतीसाठी गेलेला खर्च वाया गेला. त्यामुळे पुढील वर्षभर द्राक्ष वेलीचे संगोपन कसे करायचे, पीक कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? असा प्रश्‍न द्राक्ष उत्पादकांसमोर आहे. सरकारने द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे बंधू रमेश कोल्हे यांची पंधरा एकर क्षेत्रात द्राक्ष बाग आहे. मागील वीस दिवसात फवारणी, डिझेल, ट्रॅक्‍टर चालकाची मजुरी आदींसाठी 27 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. फवारणी करूनही बागेतील 70 टक्के घडावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. 

कर्ज वसुलीवर परिणाम 
सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर म्हणाले नारायणगाव, गुंजाळवाडी, येडगाव, मांजरवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादकांना सोसायटीमार्फत एप्रिल महिन्यात सतरा कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. 31 मार्च 2020 पूर्वी पीक कर्जाचा भरणा करावयाचा आहे. द्राक्ष पीक अडचणीत सापडल्याने वसुलीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spray the cost of spraying grapes on Junnar taluka