दहावी, बारावीचा निकाल वेळेतच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

 दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

पिंपरी - दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत कार्यरत असलेल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, तरीही उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनाही निवडणूक कामासाठी रुजू होण्याची पत्रे येऊ लागली असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीअभावी निकालाचे काम रखडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, याबाबत विभागीय शिक्षण मंडळाला विचारले असता, अशाप्रकारे शिक्षकांची कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. अध्यक्ष तुकाराम सुपे म्हणाले, ‘‘उत्तरपत्रिका तपासणीचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशा सूचना यापूर्वीच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे निवडणुकीच्या कामाचे नियोजन झाले आहे.’’

शिक्षकांना निवडणुकीचे काम लावल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीची कामे रखडल्याची कोणतीही लेखी तक्रार राज्यातील विभागीय मंडळांकडून अद्याप आलेली नाही. दहावी, बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लावण्याचाच प्रयत्न आहे.
- डॉ. शकुंतला काळे,  अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC and HSC results in time