दहावीच्या एकतीस लाख प्रश्‍नपत्रिका डाउनलोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - शिक्षकांनी वर्गात शिकविलेले अभ्यास, पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या सूचना व पालकांचा सल्ला घेत दहावीचे विद्यार्थी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. बालभारतीने त्यांच्यासाठी सराव प्रश्‍नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. आतापर्यंत या संकेतस्थळावरून ३१ लाख सहा हजारांहून अधिक प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांनी डाउनलोड केल्या आहेत. तसेच, रविवारी तीन लाख २६ हजारांहून अधिक प्रश्‍नपत्रिका डाउनलोड झाल्याचे दिसून आले.

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदाच्या परीक्षेत प्रश्‍नपत्रिका कशा असतील, याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) मागील आठवड्यात सराव प्रश्‍नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत.

त्याशिवाय प्रश्‍नपत्रिका सोडविताना अपेक्षित उत्तरे कशी असावीत, प्रश्‍नपत्रिका किंवा कृतिपत्रिका कशा सोडवाव्यात, यासाठी प्रश्‍नपत्रिकेचा पहिला संच अपलोड झाल्यानंतर अपेक्षित उत्तरपत्रिकादेखील संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यात पहिल्या संचातील प्रश्‍नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका अपलोड करण्यात येतील. तसेच, विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर व्हिडिओद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रश्‍नपत्रिकांचा दुसरा संच संकेतस्थळावर अपलोड केला जाईल. प्रत्येक विषयाच्या सराव प्रश्‍नपत्रिकांचे चार संच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संकेतस्थळावर टप्प्या-टप्याने अपलोड केले जाणार आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव करता येईल, अशी माहिती बालभारतीच्या ईडीपी विभागाचे प्रमुख योगेश लिमये यांनी दिली.

९० टक्के प्रश्‍नपत्रिका अपलोड 
दहावीच्या सराव प्रश्‍नपत्रिकेच्या पहिल्या संचातील ९० टक्के प्रश्‍नपत्रिका बालभारतीच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. विद्यार्थी मराठी (प्रथम भाषा), गणित भाग एक आणि दोन, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि दोन, इंग्रजी (तृतीय भाषा), इंग्रजी (प्रथम भाषा), हिंदी (प्रथम भाषा) या विषयांच्या प्रश्‍नपत्रिका सर्वाधिक प्रमाणात डाउनलोड करून घेत आहेत.

बालभारतीच्या संकेतस्थळावरून इंग्रजी, हिंदी, मराठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित या विषयांतील सराव प्रश्‍नपत्रिका डाउनलोड करून घेतल्या आहेत. दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या प्रश्‍नपत्रिका मला उपयुक्त ठरणार आहेत.
- तनुजा शिंदे, अंजली इंग्लिश मीडियम स्कूल, वडगाव शेरी

Web Title: SSC Exam Question Paper Education Website